आजारांचा फैलाव झाल्यास ट्रॉलरमालक जबाबदार; मत्स्य खात्याचा इशारा
जेटी परिसरात इतर खबरदारीच्या उपाययोजना सुरू
बाधित मजुरांवर बाळ्ळी आरोग्य केंद्रात उपचार सुरू
मडगाव : कुटबण जेटीवरील अस्वच्छता, कचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि वाढती गर्दी यामुळे आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात होऊन अवघा महिना होत असतानाच दोन मजुरांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे जेटीवरील आरोग्यविषयक परिस्थितीबाबत चिंता वाढली असून, आजारांचा आणखी फैलाव झाल्यास ट्रॉलरमालकांना जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशारा आरोग्य खात्याने मत्स्यव्यवसाय खात्याला दिला आहे.
डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर आरोग्य खात्याने हालचाली सुरू करत कुटबण जेटीवरील सुमारे अडीच हजार मजुरांची तपासणी केली. बाधित झालेल्या दोन्ही मजुरांना बाळ्ळी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे.
संसर्गाचा धोका लक्षात घेऊन जेटी परिसरात खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. कुटबण जेटीवर आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या दोन वर्षांत येथे काम करणाऱ्या मजुरांना डेंग्यू, मलेरिया तसेच कॉलरासारख्या आजारांची लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जेटीवरील मूलभूत स्वच्छता सुविधा, पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन आणि परिसराची नियमित स्वच्छता याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्वच्छतेचा अभाव
जेटीवर मासेमारीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात मजूर आणि ट्रॉलरची गर्दी होते. त्यातच कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लागल्याने आणि स्वच्छतेचा अभाव असल्याने रोगराई पसरण्यास पोषक वातावरण निर्माण होत आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.