गोवा

Music Festival | पणजीत कुर्डीकर संगीत संमेलन रंगतदार

Music Festival | प्रमुख पाहुणे गोवा संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य तथा नामवंत शास्त्रीय गायक डॉ. शशांक मक्तेदार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
१८ वे पंडित कुर्डीकर संगीत संमेलन रविवारी कला अकादमीच्या कृष्ण कक्षात गायन वादन मैफिलींनी रंगले. प्रमुख पाहुणे गोवा संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य तथा नामवंत शास्त्रीय गायक डॉ. शशांक मक्तेदार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पंडित मारुती कुर्डीकर शिष्य परिवाराचे अध्यक्ष गोरख मांजरेकर उपस्थित होते. त्यांनी स्वागत केले. डॉ. मक्तेदार यांच्या हस्ते, पंडित कुर्डीकर यांचे ज्येष्ठ शिष्य प्रेमानंद आमोणकर व पांडुरंग गावस यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळच्या सत्रात प्रथम सुनील दिवकर यांचे गायन झाले. त्यांनी नटभैरव राग आळवून एक अभंग सादर केला. त्यानंतर पंडित कुर्डीकर यांचे ज्येष्ठ शिष्य दामोदर हेदे व मिलिंद तळवलकर यांचे तबला सहवादन झाले.

सकाळच्या सत्राचा समारोप गायक धनंजय जोशी यांच्या गायनाने झाला. त्यांनी चारुकेशी राग आळवला व एक नाट्यगीत सादर केले. सायंकाळच्या सत्रात प्रथम तुकाराम बिटये गोवेकर यांचे शिष्य महादेव गावस व दिगंबर वेळगेकर यांचे तबला सहवादन झाले.

लक्ष्मीकांत खांडेकर (सतार) व प्रशांत महाले (बासरी) यांचे सहवादन झाले व पुणे येथील प्रसिद्ध तबलावादक अजिंक्य जोशी यांच्या बहारदार तबलावादनाने सांगता झाली. दत्तराज म्हाळशी, चारुदत गावस, एकनाथ बोरकर, तुकाराम बिटये गोवेकर, प्रेमानंद आमोणकर, राज केरकर, चंद्रकांत गडकर यांनी साथसंगत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT