पणजी : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून 1.52 कोटी रुपयांचा गंडा घालणार्या एका संशयितास गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे पोलिस स्थानकाच्या पथकाने मुंबईतून अटक केली.
रॉनी फिलिप सिक्वेरा (65, रा. औदुंबर, छाया, सीएचएस बिल्डिंग, ए-1, फ्लॅट क्रमांक 402, आयसी कॉलनी रोड, भारत बँकेजवळ, मंडपेश्वर बोरिवली पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र) असे त्याचे नाव आहे. मडगाव येथील एका व्यक्तीच्या तक्रारीवरून 26 सप्टेंबर 2025 रोजी गुन्हे अन्वेषण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीनुसार संशयितांनी वेगवेगळ्या मोबाईल आणि व्हॉटस्अॅप क्रमांकावरून तक्रारदाराला उच्च परताव्याचे ऑनलाइन गुंतवणुकीचे खोटे आश्वासन देऊन अनेक व्यवहार करण्यास प्रवृत्त केले आणि तक्रारदाराने गुंतवलेली रक्कम परत मागितली तेव्हा त्यांनी पैसे काढण्यासाठी अतिरिक्त पैसे मागण्यास सुरुवात केली. या फसव्या गुंतवणुकीमुळे, तक्रारदाराचे एकूण रु. 1.52 कोटी इतके आर्थिक नुकसान झाले.
तपास आणि सखोल आर्थिक विश्लेषणाच्या आधारे, सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांकडून एका संशयिताची ओळख पटवण्यात आली. पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता व बी. व्ही. श्रीदेवी आणि पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल पोळेकर, हवालदार अनय नाईक आणि पोलिस कॉन्स्टेबल सिद्रामय्या मठ यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक मुंबईला गेले आणि रॉनी फिलिप सिक्वेरा ( 65) याला अटक केली. तांत्रिक आणि आर्थिक विश्लेषणाच्या आधारे, तपासादरम्यान, असे उघड झाले की या आरोपीने त्याच्या बँक खात्यामध्ये 35 लाख रुपये घेतले होते. प्राथमिक तपासात असे आढळून आले की, संशयित आरोपी आणि त्याची पत्नी अशाच गुन्ह्यात इतर दोन राज्यांमध्येही सहभागी आहेत. संशयिताला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सायबर क्राइम पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर तपास करत आहेत.