पणजी: प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याकडे कीर्तनकारांचे निवेदन सादर करताना विवेकबुवा जोशी, गुरूदासबुवा सुतार, संदीप केळकर, वंदना जोशी, सत्यवान नाईक, अशोक आमशेकर व इतर. 
गोवा

Marathi Language Movement-मराठी राजभाषा आंदोलनाला 137 कीर्तनकारांचा पाठिंबा

राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी पाठिंब्याचे निवेदन समितीकडे सुपूर्द

पुढारी वृत्तसेवा

पणजी : गोवा मराठी राजभाषा निर्धार समितीने सुरू केलेल्या मराठी राजभाषा आंदोलनाला विविध क्षेत्रांतील - मान्यवरांचा पाठिंबा मिळत असून, आता राज्यातील १३७ कीर्तनकारांनी निवेदनाद्वारे या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. कोकणीसोबत मराठी भाषेलाही गोव्याची राजभाषा म्हणून दर्जा मिळावा, या मागणीला कीर्तनकारांनी समर्थन दिले आहे.

फोंडा येथे काही दिवसांपूर्वी राज्यातील ३२२ लेखक साहित्यिकांच्या पाठिंब्याचे निवेदन व - समितीकडे देण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी १३७ कीर्तनकारांच्या - पाठिंब्याचे निवेदन मराठी राजभाषा निर्धार समितीचे राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

प्रातिनिधिक स्वरूपात ह.भ.प. - विवेकबुवा जोशी, ह.भ.प. सौ. वंदना जोशी, ह.भ.प. गुरुदासबुवा सुतार आणि ह.भ.प. संदीप केळकर यांनी कीर्तनकारांच्या स्वाक्षरीचे निवेदन राष्ट्रपती आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी समितीकडे सुपूर्द केले. यावेळी सत्तरी प्रखंडाचे पालक डॉ. अशोक आमशेकर, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, ज्येष्ठ व्यापारी व समाजकार्यकर्ते सदानंद तथा नंदा काणेकर आणि सत्तरी प्रखंडप्रमुख विजय नाईक उपस्थित होते.

राज्यात भजन, कीर्तन आणि प्रवचनाची समृद्ध परंपरा असून, वर्षभर मंदिरांचे वर्धापनदिन, जीर्णोद्धार, विविध सण-उत्सव, काले आणि जत्रोत्सवांमध्ये भजन, कीर्तन, प्रवचन व अभंगगायन केले जाते. चैत्रमास, रामनवमी, हनुमान जयंती, एकादशी, वारी, दिंडी, श्रावणमास, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि महाशिवरात्री यांसारख्या उत्सवांमध्ये गोवाभरातील मंदिरांत मराठी भाषेत नामसंकीर्तनाची परंपरा आजही सुरू आहे.

ज्येष्ठ, नामवंत तसेच नवोदित कीर्तनकार, प्रवचनकार आणि आध्यात्मिक उपासक अशा १३७ जणांनी मराठी राजभाषेच्या मागणीला पाठिंबा देत हे निवेदन दिले आहे. सुहासबुवा वझे, विवेकबुवा जोशी, गुरुदासबुवा सुतार, वंदनाताई जोशी, किरणबुवा तुळपुळे आणि डॉ. अनुजा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

राज्यभरात होतात सुमारे अडीच हजार कीर्तने...

दरवर्षी राज्यात सुमारे दोन ते अडीच हजार कीर्तने विविध ठिकाणी आयोजित केली जातात. मराठी कीर्तन परंपरेच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीचे रक्षण व संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संस्कृती रक्षणाचा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून गोमंतकीय कीर्तनकारांचे योगदान अधोरेखित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT