पेडणे : मोरजी पंचायत क्षेत्रातील टेंबवाडा समुद्रकिनारी भागात डिसेंबर 24 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत एकूण 106 सागरी कासवाने किमान साडेदहा हजार अंडी घातल्याची माहिती उपलब्ध झाली. टेंबवाडा-मोरजी किनारी अभ्यास केंद्र आहे. त्या ठिकाणी कसल्याच प्रकारची माहिती देण्यास कर्मचारी टाळाटाळ करतात. तीन सागरी कासवांच्या अंड्यातून बाहेर पिल्ले पडली होती. पिल्ले समुद्रात सोडण्यास कर्मचार्यांना यश आले. परंतु तीन सागरी कासवांच्या अंड्यातून किती पिल्ले बाहेर पडली याची माहिती या अभ्यास केंद्रात उपलब्ध नाही. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर आत्तापर्यंत किती सागरी कासवाने अंडी घातली? एक सागरी कासव किती अंडी घालतात? आणि 106 सागरी कासवांनी किती अंडी बरोबर घातलेली आहे? तीन सागरी कासवांच्या अंड्यातून किती पिल्ले सोडण्यात आली? याची माहिती अभ्यास केंद्रात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मोरजी सरपंच पवन मोरजे यांनी केली आहे.
टेंबवाडा मोरजी समुद्रकिनारी भागात मागच्या 25 वर्षांपासून सागरी कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली जाते. या अभ्यास केंद्रामध्ये किती सागरी कासव दिवसाला आली? किती अंडी घातली? किती अंडी नासाडी झाली? किती पिल्ले समुद्रात सोडली? याचा तपशील नोंदवही मध्ये उपलब्ध होता. मात्र 25 वर्षांनंतर यंदाच या अभ्यास केंद्रात कुठल्याही प्रकारची माहिती उपलब्ध होत नाही. याविषयी कर्मचार्याकडे संपर्क साधला असता कर्मचारी सांगतात आम्हाला वरिष्ठ अधिकार्यांना माहिती देण्यास मंजुरी दिलेली नाही. तुम्ही थेट कांपाल पणजी येथे संपर्क साधून माहिती घेऊ शकतात.
गेल्यावर्षी हंगामात एकूण 205 सागरी कासवांनी 20,000 पेक्षा जास्त अंडी घातली होती. यंदा डिसेंबर 24 ते फेब्रुवारी 20 या कालावधीत 106 सागरी कासवांनी 10 हजार 500 अंडी घातली आहेत. भविष्यात यंदाच्या हंगामात हा आकडा 300 सागरी कासवापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अधिकार्याकडे संपर्क साधला असता त्यांनीही आम्हाला वरिष्ठ अधिकार्यांनी माहिती देण्यास संमती दर्शवली नाही. परंतु महिन्याच्या सुरुवातीलाच मागच्या महिन्यात किती सागरी कासव आली होती, किती अंडी घातली आणि किती पिल्ले सोडली? याचा हिशोब उपलब्ध होणार असल्याची माहिती पेडणेकर नामक अधिकार्यांनी फोनवर दिली.