Latest

धोक्याचे विक्रम…

Arun Patil

एकविसाव्या शतकातील सर्वात मोठे आव्हान म्हणून जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होणार्‍या हवामान बदलांचा उल्लेख केला जातो. मानव जातच नव्हे, तर संपूर्ण जीवसृष्टीच तापमानवाढीमुळे नष्ट होते की काय? अशी भीती पर्यावरणतज्ज्ञांना वाटते आहे. तशातच यंदाचा जुलै 2023 हा सुमारे सव्वा लाख वर्षांतील सर्वात उष्ण महिना म्हणून नोंदला गेला आहे. एका अहवालानुसार, नोव्हेंबर 2022 पासून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत 170 देशांतील सरासरी तापमान 30 वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक राहिले आहे.

संपूर्ण मानवतेसाठी धोकादायक बनलेली जागतिक तापमानवाढीची पातळी ही औद्योगिक पूर्वस्थितीच्या तुलनेत 1.3 अंश सेल्सिअसची पातळी ओलांडून पुढे गेली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, जुलै 2023 हा महिना आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण राहिला आणि हा सुमारे सव्वा लाख वर्षांतील सर्वात उष्ण महिना म्हणून नोंदला गेला आहे. दुसरीकडे, क्लायमेंट सेंट्रलकडून अलीकडेच जारी केलेल्या अहवालानुसार, नोव्हेंबर 2022 पासून ते ऑक्टोबर 2023 पर्यंत जागतिक तापमानाने एक नवीन विक्रम नोंदविला. आतापर्यंतच्या इतिहासात 12 महिन्यांतील हा सर्वात उष्ण कालावधी राहिला आहे.

या कालावधीत 170 देशांतील सरासरी तापमान 30 वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक राहिले आहे. म्हणजेच जगभरातील 7.8 अब्ज लोक म्हणजेच जगातील सुमारे 99 टक्के लोकसंख्या ही उष्ण वातावरणात राहण्यास प्रवृत्त झाली आहे. त्याचवेळी आशेचा एक किरणही पाहावयास मिळत आहे. 2030 पर्यंत सौरऊर्जा, पवनऊर्जा, इलेक्ट्रिक मोटार आणि हीट पंपसारख्या क्लीन एनर्जी टेक्नॉलॉजी वापराबाबत वाढती मागणी पाहता, आगामी काळात ऊर्जा क्षेत्रात कार्बन उत्सर्जनामुळे डागाळलेले जगाचे चित्र हे काही प्रमाणात स्वच्छ होणार आहे. त्यामुळे प्रदूषित हवेत श्वास घेण्यासाठी प्रवृत्त झालेल्या जनतेला दिलासा मिळू शकतो; पण तेवढ्यावर समाधान मानून चालणार नाही.

आजघडीला जगाच्या कानाकोपर्‍यात पडणारा प्रचंड पाऊस, महापूर, चक्रीवादळ, भूस्खलनामुळे माणसाच्या जीवनावर प्रश्न उपस्थित राहत आहेत. संपूर्ण जगासाठी व्यापक प्रमाणात डोकेदुखी बनलेल्या ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येपासून कोणताही देश वाचलेला नाही. अनेक संशोधनांनंतर हवामान बदलांमुळेच सध्याचे निसर्गचक्र बिघडलेले आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जागतिक पातळीवरच्या कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात 90 टक्के प्रमाण हे जीवाश्म इंधनाचे आहे. ते 2021-22 मध्ये विक्रमी पातळीवर पोहोचले होते. ज्याप्रमाणे जगाची लोकसंख्या वाढत आहे, ते पाहता प्रत्येक देश विकासासाठी नैसर्गिक स्रोतांची हानी करण्यास आतूर झालेला दिसत आहे. त्यामुळे उष्ण होणार्‍या पृथ्वीला इतक्यात दिलासा मिळेल, असे वाटत नाही.

सध्याच्या पॉलिसी सेटिंग्ज (स्टेप्स) च्या आधारावर 'आयईए'ने म्हटले की, 2030 पर्यंत संपूर्ण जगभरातील रस्त्यांवर आजच्या तुलनेत सुमारे 10 पट अधिक इलेक्ट्रिक गाड्या असतील. अमेरिकेकडून आजघडीला जेवढी ऊर्जा निर्माण होत नाही, तेवढी ऊर्जा ही 'सौर पीव्ही'तून तयार होईल. या दशकाच्या शेवटी जगात दरवर्षी 1,200 गीगावॉटपेक्षा अधिक सौर पॅनेल तयार करण्याची क्षमता विकसित होईल. 2030 पर्यंत 500 गीगावॉट उत्पादन क्षमता विकसित होण्याचा अंदाज आहे. जागतिक पातळीवर तयार होणार्‍या एकूण वीजनिर्मितीत शाश्वत ऊर्जा स्रोतातून तयार होणार्‍या विजेचा वाटा हा सध्याच्या 30 टक्क्यांवरून 500 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. सोलर हीट पंप तसेच अन्य क्लीन इलेक्ट्रिक हीटिंग प्रणालीची विक्री ही जगभरात जीवाश्म इंधनावर चालणार्‍या बॉयलर विक्रीच्या तुलनेत अधिक राहील. एवढेच नाही, तर कोळसा आणि गॅसने सुरू होणार्‍या प्रणालीच्या तुलनेत नव्या पवनऊर्जा योजनेतील गुंतवणूक ही तीन पट अधिक राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT