Latest

आरक्षण द्या, अन्यथा २४ डिसेंबरनंतर मुंबईत आंदोलन : जरांगे पाटील

गणेश सोनवणे

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा-येत्या २४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यावे अन्यथा २४ डिसेंबरनंतर मुंबईत आंदोलन करणार, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथील सभेत दिला. आपल्या भाषणात त्यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार टीका केली. आरक्षण सोपा विषय नाही, जमीन, जागा जितकी महत्त्वाची तितकेच आरक्षण महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीत घ्यायचेच, असाही निर्धार केला.

सकल मराठा समाजाच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे मनोज जरांगे-पाटलांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकल मराठा समाज आणि परिसरातील ६७ गावांनी सभेचे आयोजन केले होते. या सभेला ५० ते ६० हजार मराठा बांधवांनी हजेरी लावली. सभेला महिलाही मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. सभेला मराठा खासदार, आमदार व मराठा पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. मराठा आंदोलनाला राज्यातील मराठा बांधवांचा प्रतिसाद मिळतो आहे. आजची शेणीत येथील सभा याचेच प्रतीक आहे, असे सांगत त्यांनी नाशिककरांचे आभार मानले.

आरक्षण दृष्टिक्षेपात आले आहे म्हणून आता मागे हटू नका, एकजूट कायम ठेवा. सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ. महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी २४ डिसेंबर हा विजयाचा दिवस असू शकतो. पण २४ डिसेंबरपर्यंत सरकारने आरक्षण दिले नाही तर २५ डिसेंबरनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, पण त्याआधी एक डिसेंबरपासून शांततामय मार्गाने गाव तिथे साखळी उपोषणाची तयारी करा, असे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले. आरक्षणाचा फायदा कमीत कमी पावणेदोन कोटी मराठा बांधवांना होणार आहे. आरक्षण नसल्यामुळे कोणाच्याही हाताखाली मराठ्याच्या मुलाला काम करायची वेळ आली. आरक्षणासाठी समाजाने एक होण्याचे आवाहन करताना आपल्या तडाखेबंद भाषणात जरांगे-पाटील यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना थेट इशारा दिला.

भुजबळांवर जोरदार टीका

मराठा आरक्षणाच्या वाटेला गेला, तर वाजविलाच समजा. जनतेचे पैसे तुम्ही खाल्ले म्हणून तुम्ही जेलमध्ये गेले. ज्याची लायकी नाही त्याचे आपण नाव घेत नसतो. व्यक्ती म्हणून तेव्हा विरोध नव्हता, पण आता आहे. मराठा व ओबीसीचे वाद होतील, दंगली होतील, असे वक्तव्य तुम्ही करायला लागला आहात. मलाही माहीत आहे तुम्ही कुठे भाजी विकत होता. कोणाचा बंगला ढापला. तुमच्या एकाही कॉलेजला सावित्रीबाई फुलेंचे नाव नाही. जातीजातीत दंगली घडवण्यासाठी विष ओकायला लागले असून, राजकीय स्वार्थासाठी मराठा व ओबीसीत दंगल घडवून आणायचा यांचा डाव आहे, असा टोला जरांगे-पाटील यांनी अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता लगावला. ते जातीय तेढ निर्माण करू पाहाताय, पण आपण ती निर्माण होऊ द्यायची नाही. खेड्यापाड्यातील मराठा बांधव व ओबीसी समाज एकत्र आनंदाने राहात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

नोकरभरती थांबवा

एक डिसेंबरपासून नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करा. परंतु उग्र आंदोलन करू नका, जाळपोळ करू नका, आत्महत्या करू नका. सरकारने मराठा बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करू नये. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नोकर भरतीप्रक्रिया करू नका, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

३२ लाख नोंदी सापडल्या

कालपर्यंत मराठा समाजाला आरक्षणासाठी नोंदी सापडत नव्हत्या. तिथे आज ३२ लाख नोंदी सापडल्या आहेत. अजूनही सापडणार आहेत. गेली ७० वर्षे पुरावे सापडत नव्हते. आता राज्यातील सगळ्या जिल्ह्यात १८०५ ते १९६७ पर्यंतचे जुने पुरावे सापडत आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना लगेच दाखले वाटप सुरू आहे. आरक्षण दिल्याशिवाय शासनाची सुटका नाही, असा दावाही त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT