Latest

ह्दयद्रावक! कोल्हापूरमध्‍ये दुचाकीला अपघात, आईसमोरच बालिकेचा अंत

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  केएमटी बसने दुचाकीला ठोकरल्याने, आईसोबत दुचाकीवरून शाळेला जाणार्‍या संस्कृती रत्नदीप खरात (वय ४, रा. लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नर) या चार वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सानेगुरुजी वसाहतीजवळ प्रतिराज बंगल्याच्या दारात भरपावसात ही घटना घडली. बसचे चाक संस्कृतीच्या डोक्यावरून गेल्याने तिने आईसमोरच प्राण सोडला.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संस्कृतीचे वडील रत्नदीप खरात यांची लक्ष्मीपुरीत मोबाईल शॉपी आहे. संस्कृती ही रावजी मंगल कार्यालयाशेजारी असणार्‍या इंग्रजी स्कूलमध्ये के.जी.च्या वर्गात शिकत होती. नेहा खरात या काही दिवसांसाठी माहेरी जीवबा नाना पार्क येथे राहण्यासाठी गेल्या आहेत. तेथून संस्कृतीला शाळेत सोडण्यासाठी त्या दुचाकीवरून (एम.एच. 09, डीएच 243) जात होत्या.

सानेगुरुजी वसाहतीकडून त्या क्रशर चौकाच्या दिशेने निघाल्या होत्या. त्याचवेळी सानेगुरुजी वसाहत येथील प्रतिराज बंगल्याच्या दारातील स्टॉपवर केएमटी बस (एम.एच. 09, सीडब्ल्यू 0355) थांबली होती. बसच्या पुढे जाण्याचा प्रयत्न नेहा करत असतानाच, थांबलेली बस पुढे जाऊ लागली. चालकाने बस उजवीकडे वळविल्याने बसने नेहा यांच्या दुचाकीला ठोकरले. त्यामुळे दुचाकीवरून माय-लेकी खाली पडल्या. नेहा बाजूला फेकल्या गेल्या, तर संस्कृती ही बसच्या उजव्या बाजूच्या चाकाखाली सापडली. बसचे चाक तिच्या डोक्यावरून गेले. लोकांनी तातडीने संस्कृतीला एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी नेले. परंतु, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेने खरात कुटुंबीयांना धक्का बसला असून, या घटनेमुळे नेहा भेदरून गेल्या आहेत.

चालकाविरोधात गुन्हा दाखल

अरुंद रस्ता न पाहता चालकाने बस अचानक उजवीकडे वळविल्याने दुचाकीला धक्का लागून हा अपघात झाला. या अपघातास जबाबदार धरत जुना राजवाडा पोलिसांनी चालक दीपक शिवाजी सूर्यवंशी (रा. हेरले, ता. हातकणंगले) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर बसचालकाने तेथून पळ काढला होता.

अपघातानंतर केएमटीला आली जाग

स्पीडब्रेकर, त्यापुढे अगदी थोड्या अंतरावर बसस्टॉप, दुभाजकामुळे अरुंद बनलेला रस्ता हीच या अपघाताची प्रमुख कारणे आहेत. अपघाताची घटना घडल्यानंतर केएमटी प्रशासनाला जाग आली. त्यांनी तेथून पुढे काही अंतरावर रिकाम्या जागेशेजारी हा बसस्टॉप तत्काळ हलविला. परंतु, बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर केएमटीला हे उशिरा शहाणपण सुचले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT