Genetic Disorders 
Latest

Genetic Disorders : आनुवंशिक आजार

अनुराधा कोरवी

एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे संक्रमित होत जाणारे रोग म्हणजे आनुवंशिक रोग होय. आपल्या डीएनएमधील घटकांमुळे हे आजार होत असतात. काही जैविक बदलांमुळे या जनुकांमध्ये परिवर्तन घडून येत असते. हे परिवर्तन (म्यूटेशन) एका जनुकांमध्ये किंवा संपूर्ण गुणसूत्रांमध्ये देखील होऊ शकते.

एका गुणसूत्रांमध्ये 20 हजारांहून जास्त जनुके असतात. जनुकांच्या संरचनेत बदल होणे हे आनुवंशिक रोगाचे प्रमुख कारण आहे. जनुके ही डीएनएचाच एक भाग असतात. डीएनए, आरएनए आणि प्रथिने यांनी मिळून गुणसूत्रे तयार होत असतात. जनुकांमधील बदलांमुळे गुणसूत्रे देखील बदलतात. जनुकीय बदलामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, अल्जायमर, कॅन्सर, स्थूलता, गाठी होणे यांसारखे आजार होऊ शकतात. गुणसूत्रातील बदलांमुळे डाऊन सिंड्रोम होण्याची शक्यता असते. मायटोकॉन्ड्रियल इनहेरिटन्स हा एक प्रकारचा नेत्ररोग आहे जो आनुवंशिक आहे. स्मरणशक्ती कमकुवत होणे, हे देखील आनुवंशिकतेमुळेच होऊ शकते.

थॅलेसीमिया ः हा रक्ताशी संबंधित असणारा आजार आहे. यामध्ये दोन प्रकार आहेत एक मेजर आणि दुसरा मायनर. आई-वडिलापैकी जेव्हा एका कुणाकडून क्षतिग्रस्त जनुक मिळते तेव्हा मायनर थॅलेसीमियाचा प्रकार उद्भवतो. जेव्हा आई आणि वडील दोघांकडूनही क्षतिग्रस्त जनुके मिळतात तेव्हा मेजर थॅलेसीमियाचा प्रकार उद्भवतो. याला कारणीभूत ठरणार्‍या आनुवंशिक गुणांबद्दल लोकांमध्ये जागरूकता नसल्याने या आजाराने ग्रस्त असणार्‍या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर उपाय म्हणून गर्भवती स्त्रीने पहिल्या तीन महिन्यांमध्येच थॅलेसीमियाची चाचणी करून घेणे आवश्यक आहे. ती जर थॅलेसीमिक असेल, तर पतीचीही चाचणी करून घेणे आवश्यक आहे. दोघांनाही त्रास असेल, तर मुलाला हा त्रास उद्भवण्याचा कितपत धोका आहे हे जाणून घेण्यासाठी अँटी नॉटल डायग्नोसिस करून घ्यावी.

लग्नाआधीच या चाचण्या करून घेणेही फायद्याचे ठरू शकते. कारण दोघेही जर थॅलेसीमिक असतील, तर लग्न करू नये. मधुमेह, कर्करोग या गंभीर आजारांबाबतही असे मानले जाते की ते आनुवंशिक आहेत. यासंदर्भात अनेक पातळ्यांवर अभ्यास सुरू आहेत. पण स्तन, गर्भाशय आणि अंडाशयाचे कॅन्सर होण्यात आनुवंशिकता हे मुख्य कारण असू शकते. 50 वर्षांपेक्षा कमी वयात होणारा कॅन्सर हा कौटुंबिक कारणांमुळे होऊ शकतो, असे काही अभ्यासातून दिसून आले आहे. अशाच प्रकारे आई-वडील मधुमेही असतील तर मुलांना हा आजार होण्याची शक्यता असते, असेही दिसून येते. मधुमेह असणार्‍यांच्या मुलांना मधुमेह होतोच असे नाही; परंतु आई आणि वडील दोघांनाही मधुमेह असेल, तर मात्र मुलांना मधुमेह होण्याची 90 टक्के शक्यता असते, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. हृदयरोगामध्ये देखील आनुवंशिकता हे एक मुख्य कारण आहे. आनुवंशिक कारणांमुळे निर्माण होणार्‍या हृदयाच्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या देखील असू शकतात.

या पार्श्वभूमीवर शिस्तबद्ध जीवनशैली स्वीकारा. नियमितपणे व्यायाम करा. वजन आटोक्यात ठेवा. संतुलित आणि पोषक आहार घ्या. जास्त वेळ उपाशी राहू नका. रक्तशर्करा वाढू नये यासाठी चालण्याचा व्यायाम चुकवू नका. संतुलित आणि पोषक आहार घ्या. तणावाखाली राहू नका. सकारात्मक विचार करा. पुरेशी झोप घ्या. मिठाचे प्रमाण कमी असू द्या. धूम्रपान आणि मद्यपान करू नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT