Latest

GDP : भारताचा विकास दर आता ६.९ टक्के; मंदीतही मिळू शकतो दिलासा

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्ष 2022-23 साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन विकास दराचा अंदाज 6.5 टक्क्यांवरून 6.9 टक्के असा वर्तविला आहे. त्यामुळे वैश्विक पातळीवर मंदीसद़ृश वातावरण असले तरी भारताला मोठा दिलासा मिळू शकतो.

जागतिक बँकेने नुकताच आपला ताजा अहवाल प्रकाशित केला असून त्यानुसार अमेरिका, युरोझोन आणि चीनमधील घडामोडींचा परिणाम भारतावरही दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षात सरकार 6.4 टक्क्यांचे वित्तीय तुटीचे लक्ष्य गाठेल, असा विश्वास जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्षात महागाई 7.1 टक्के राहील, असा जागतिक बँकेचा अंदाज आहे. बिघडलेल्या बाह्य वातावरणात 2022-23 या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर 6.9 टक्के असू शकतो, असे अहवालात म्हटले आहे. हा अंदाज बरोबर असला तरी आर्थिक वर्ष 2022 मधील  8.7 टक्क्यांच्या तुलनेत जीडीपी वाढीचा दर काहीसा घसरू शकतो. याआधी स्वित्झर्लंडची ब्रोकरेज कंपनी युबीएस इंडियानेदेखील 2022-23 मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर 6.9 टक्के असेल, असा अंदाज वर्तविला होता.

महागाईमुळे जीडीपीवर परिणाम

वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेसह जगभरातील मध्यवर्ती बँका त्यांचे व्याज दर सातत्याने वाढवत आहेत. त्याचा थेट परिणाम देशाच्या जीडीपीवर होत आहे. यासोबतच चीनमधील कोरोना लॉकडाऊनमुळे संपूर्ण जगाच्या पुरवठा साखळीवर वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जगात मंदीची भीती वाढली आहे.

जागतिक रेटिंग एजन्सी एस अँड पी या ग्लोबल रेटिंग्जने अलीकडेच आर्थिक विकास दराचा अंदाज 7 टक्क्यांवर आणला आहे. देशांतर्गत मागणीमुळे अर्थव्यवस्थेवर जागतिक मंदीचा परिणाम कमी होईल, असेही या रेटिंग एजन्सीने म्हटले आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला एजन्सीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर 7.3 टक्के आणि 2023-24 मध्ये 6.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

भारत सर्वांत वेगवान अर्थव्यवस्था

चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत भारताचा विकास दर 6.3 टक्क्यांवर घसरला. उत्पादन आणि खाण क्षेत्राच्या साधारण कामगिरीमुळे विकास दर मंदावला आहे. भारत जगातील सर्वात वेगवान विकास दर असलेली अर्थव्यवस्था आहे. 2022 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत चीनचा विकास दर 3.9 टक्के राहिला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जुलै-सप्टेंबर तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 6.3 टक्के राहिला, जो मागील वर्षी याच तिमाहीत 8.4 टक्के होता. तसेच पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून 2022) ते 13.5 टक्के होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT