पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम (Gaza ceasefire) कालावधी आज (दि.३०) सकाळी 10:22 वाजता (भारतीय वेळेनुसार) एक दिवसासाठी वाढविण्यात आला. युद्धविराम कालावधी संपुष्टात येण्यास काही मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना ही घोषणा करण्यात आली. इस्रायल आणि कतारच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. हमासने आज मुक्त करण्यात येणार्या 10 ओलिसांची यादी दिली आहे, याला इस्रायलने मान्यता दिली आहे, असे वृत्त 'टाईम्स ऑफ इस्रायल'ने दिले आहे.
इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने गुरुवारी X वर एका पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, "ओलिसांची सुटका प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठीअटींच्या अधीन राहण्यासाठी युद्धविराम सुरू राहील."
ईस्त्रायल सैन्यदलाने स्पष्ट केले आहे की, हमासकडे आता सुमारे १५९ नागरिक ओलीस आहेत. या बदल्यात इस्रायलने जवळपास 30 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली. यामध्ये 22 वर्षीय पॅलेस्टिनी कार्यकर्त्या अहेद तमिमीचाही समावेश आहे,
युद्धविरामाच्या सहाव्या आणि शेवटच्या दिवशी १० इस्रायली नागरिकांसह 16 ओलिसांची सुटका करण्यात आली. दरम्यान, ३० पॅलेस्टिनी नागरिक यामध्ये १६ अल्पवयीन आणि १४ महिलांना इस्रायलने मुक्त केले आहे, असे कतारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते माजेद अल-अन्सारी यांनी जारी केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.युद्धविराम सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे ९७ ओलिसांची हमासने सुटका केली आहे, असे वृत्त 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने दिले आहे. तर इस्रायली सैन्याने दावा केला आहे की, गाझा पट्टीमध्ये अजूनही १४५ इस्त्रायली नागरिक ओलीस आहेत.