बीड; पुढारी वृत्तसेवा : येथील एका वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त गौतमी पाटील हिच्या लावणीचा कार्यक्रम (गुरुवार) रात्री आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत स्टेजवर चढण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. कार्यक्रम बंद केल्यानंतर जवळपास एक तास वाहतुकीची कोंडी झाली होती.
बीड शहरातील बार्शी नाकाभागात एकाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील हिच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याची बॅनरबाजीही शहरभर करण्यात आल्याने लावणीशौकीनांची मोठी गर्दी कार्यक्रमासाठी झाली होती. गौतमी पाटील हिची लोकप्रियता पाहून पुरेसा बंदोबस्त तसेच आयोजकांकडून उपाययोजना करणे गरजेचे होते. परंतु ती खबरदारी न घेतली गेल्याने कार्यक्रमात गौतमी पाटील यांचे नृत्य सुरु असतांना काही तरुणांनी थेट स्टेजवर जात नृत्य सुरु केले. या प्रकारानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
तरूणांची वाढलेली गर्दी आणि हुल्लडबाजी वाढल्याने अखेर आयोजकांना कार्यक्रम थांबवावा लागला. कार्यक्रम बंद केल्यानंतर परत जाण्यासाठी निघालेल्या वाहनांची गर्दी झाली होती. यामुळे जवळपास एक तास वाहतुकीची कोंडी झाली होती.
ही बातमी वाचा :