पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : आपल्या दिव्यांगावर रडत न बसता वीस वर्षीय वैष्णवी जगताप या धाडसी तरुणीने देशभरासह परदेशातील जलतरण स्पर्धेत उत्तुंग कामगिरी केली आहे. मुलगी असूनही आपण काही कमी नाही, असे सांगत तिने असंख्य अडथळ्यावर मात करीत युवा वर्गास जगण्याची नवी उमेद दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वैष्णवी हिने देशभरात विविध ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत तब्बल 41 पदकांची कमाई केली आहे. त्यात सर्वांधिक 31 सुवर्णपदक आहे. तर, 5 रौप्य व 5 कांस्यपदक जिंकले आहेत.
अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया देशातील स्पर्धेतही तिने चमकदार कामगिरी केली आहे. वैष्णवी वाकडच्या इंदिरा महाविद्यालयात बीबीएच्या तिसर्या वर्षात शिकत आहे. ती लहानपणापासून दिव्यांग आहे. पायात ताकद यावी, म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ती पाण्यात चालण्याचा व्यायाम करत. हळूहळू तिला जलतरणाची आवड निर्माण झाली.
दिव्यांगांसाठी जलतरणाच्या स्पर्धाही असतात, हे कळाल्याने तिने सन 2011 पासून स्पर्धेत सहभाग घेण्यात सुरुवात केली. मग, तिने मागे वळून पाहिले नाही. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात प्रशिक्षक अभिजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिला आई व वडील यांचे खंबीर साथ मिळत असून, एक मोठी बहिण आहे. दिव्यांगाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे तिचे ध्येय आहे.
स्पर्धेत सहभागी झाल्याने मनाने खंबीर झाले
मी लहानपणापासून दिव्यांग आहे. मला व्यवस्थित चालता येत नव्हते. पाण्यात नियमित व्यायाम केल्याने कधी जलतरणपटू झाले हे मला कळालेच नाही. प्रशिक्षक व आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे राज्य, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला. त्यात यश मिळत गेल्याने उत्साह वाढला, असे दिव्यांग जलतरणपटू वैष्णवी जगताप हिने साांगितले.