कोकणला निघालेल्या चाकरमान्यांची कोंडी; गणपती स्पेशल गाड्या महागड्या  file photo
Ganeshotsav Celebration Pandals

कोकणला निघालेल्या चाकरमान्यांची कोंडी; गणपती स्पेशल गाड्या महागड्या

Ganeshotsav 2024 | स्पेशल गाड्यांचे तिकीट दर जास्त

मोहन कारंडे
सुरेखा चोपडे

मुंबई : गणरायाचे स्वागत (Ganeshotsav 2024) करण्यासाठी मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणातील आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघाले आहेत. परंतु यंदा विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने चाकरमान्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विस्कळीत झालेली राज्यातील एसटीची वाहतूक, पश्चिम रेल्वेने सोडलेल्या गणपती स्पेशल ट्रेनचे (Konkan Ganpati special trains) जादा तिकीट दर आणि स्पेशल गाड्या विलंबाने धावत असल्याने चाकरमानी हवालदिल झाले आहेत.

राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असला तरी कोकणातील पारंपरिक गणेशोत्सवाला आगळेवेगळ महत्त्व आहे. त्यामुळे दरवर्षी मुंबई, ठाणे, पालघरमधून गणेशोत्सवाकरिता ८ ते ९ लाख चाकरमानी कोकणात जातात. यंदा मात्र चाकरमान्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यंदा सुमारे १२ लाख चाकरमानी गणेशोत्सवाकरिता कोकणात दाखल होतील, असा अंदाज आहे. शनिवारी गणरायाचे आगमन होणार आहे. कोकणातील प्रत्येक घरात गणराय विराजमान होतात. गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी चाकरमानी मंगळवारपासून मुंबईतून कोकणाच्या दिशेने निघाले आहेत. गुरुवारी सर्वाधिक चाकरमानी गरातून कोकणासाठी मुंबई महानगरातून रवाना होणार आहेत. परंतु यंदा या चाकरमान्यांना विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी जाण्याकरिता विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Konkan Ganpati special trains)

आंदोलनाचा फटका

एसटी कर्मचाऱ्यांनी आर्थिक मागण्यांबाबत मंगळव ारपासून आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे राज्यातील एसटीची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमधून सुटणाऱ्या नियमित गाड्यांना आंदोलनाचा फटका बसला आहे. नियमित गाड्यांची तिकिटे बुक केलेल्या चाकरमान्यांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा आधार घ्यावा लागल्याने तारे- वरची कसरत करत आपल्या गावी पोहोचावे लागले.

गाड्यांना लेटमार्क

चाकरमान्यांच्या सोयीसाठी रेल्वेने नियमित गाड्यांव्यतिरिक्त जादा गाड्या (Konkan Ganpati special trains) सोडल्या आहेत; परंतु या गाड्या विलंबाने धावत असल्याने चाकरमान्यांचा प्रवासवेळेत वाढ झाली आहे. मंगळवारी कोकण कन्या एक्स्प्रेस वैभववाडी स्थानकात सकाळी सव्वा सात वाजता पोहोचणे अपेक्षित होतेस, परंतु एक्स्प्रेस सकाळी सव्वा दहा वाजता पोहोचली. हीच परिस्थिती इतर गाड्यांची असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. खासकरून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांची गैरसोय होत आहे.

स्पेशल गाड्यांचे तिकीट दर जास्त

चाकरमान्यांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने ६ गणपती स्पेशल ट्रेनच्या ५६ फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला. मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी-ठोकूर, बांद्रा टर्मिनस ते कुडाळ, अहमदाबाद ते कुडाळ या गाड्यांचा यात समावेश आहे. या गाड्या स्पेशल तिकीट दर आकारून चालविण्यात येत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना जादा पैसे मोजून या गाड्यांचे तिकीट खरेदी करावे लागले आहे. याशिवाय या गाड्यांचा प्रवास वेळ साडेचौदा तासांपेक्षा जास्त असल्याने चाकरमान्यांचा प्रवास अधिकच लांबला आहे.

नियमित गाड्यांच्या स्लीपर क्लासचे मुंबई ते कणकवलीचे तिकीट ३९० रुपये, तर थर्ड एसीचे तिकीट १ हजार ७० असते. परंतु या स्पेशल गाड्यांच्या स्लीपर क्लासकरिता ४६० रुपये आणि थर्ड एसीकरिता १ हजार २५० रुपये मोजावे लागत आहेत. स्लीपर क्लासकरिता १०० ते १५०, तर थर्ड एसीकरिता ३५० रुपये जादा मोजावे लागत असल्याने चाकरमान्यांनी रेल्वेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT