पर्वतावर एक अनोखे गणेश मंदिर.  Pudhari File Photo
Ganeshotsav

घनदाट जंगलात, तीन हजार फूट उंचीवर विराजमान गणेश

गणपतीची एक पुरातन मूर्ती याठिकाणी स्थापन

पुढारी वृत्तसेवा

रायपूर : आपल्या देशात अनेक अनोखी गणेश मंदिरे आहेत; मात्र छत्तीसगडमधील दंतेवाडापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या ढोलकल पर्वतावर एक अनोखे गणेश मंदिर आहे. खरे तर हे मंदिर बंदिस्त नसून तिथे तब्बल तीन हजार फूट उंच पर्वतशिखरावर उघड्यावरच विराजमान असलेले गणपतीबाप्पा आहेत. एकदंत गणपतीची एक पुरातन मूर्ती याठिकाणी स्थापन आहे. ही मूर्ती अतिशय दुर्लभ आहे. ती किमान एक हजार वर्षे जुनी असल्याचे म्हटले जाते.

या गणपतीबाबत प्रचलित एका दंतकथेनुसार या पर्वतावरच परशुराम आणि गणपतीमध्ये एक युद्ध झाले होते. यात परशुराम यांचे आयुध ‘परशु’च्या वाराने गणपतीचा एक दात तुटला होता आणि त्यानंतरच गणपतीला ‘एकदंत’ हे नाव प्राप्त झाले+, असे म्हणतात. ढोलसारखी आकृती असल्याने या पहाडाला ‘ढोलकल’ असे नाव पडले. या पर्वताच्या नावावरूनच या गणपतीला ‘ढोलकल गणेश’ असेही संबोधले जाते. या मूर्तीला चार हात असून उजव्या हातात परशु, डाव्या हातात तुटलेला एक दात तर अन्य एका हातात अक्षरमाळा आणि मोदक आहेत. विशेष म्हणजे बाप्पांची ही मूर्ती आयुध रूपातील असून बाप्पा येथे ललितासन मुद्रेत बसलेले आहेत. बाप्पांची अशा प्रकारची मूर्ती अन्यत्र कुठेही पहायला मिळालेली नाही. या मूर्तीची स्थापना 11 व्या शतकात छिंदक नागवंशी राजांनी दंतेवाडा क्षेत्राच्या रक्षक स्वरूपात ढोलकल पहाडावर केली होती. नागवंशी राजांनी या गणपतीच्या मूर्तीची निर्मिती करून त्यावर नाग अंकित केला आहे. मूर्तीच्या संतुलनासाठी शिल्पकारांनी त्यावर साखळीचा उपयोग केला आहे. दक्षिण बस्तरच्या भोगा आदिवासी समाज आपली उत्पत्ती ‘ढोलकट्टा’ ढोलकलच्या महिला पुजारीपासून झाल्याचे मानतात. सर्वात आधी भोगा जनजातीच्या महिलेनेच येथे पूजा सुरू केली, असे मानले जाते. पहाटेच्या वेळी या महिला पुजारीच्या शंखनादाने संपूर्ण ढोलकल पर्वत शिखर गुंजायचे, असे सांगितले जाते. आजदेखील या महिला पुजारीचे वंशज या ढोलकल गणपतीची पूजा करतात. या गणपतीची मूर्ती ही येथील इंद्रावती नदीच्या खोर्‍यातील शिळेपासून तयार करण्यात आली आहे. बैलाडील पर्वत रांगेचे हे सर्वात उंच शिखर आहे. 11 व्या शतकातही इतक्या समृद्ध पद्धतीने मूर्तीची रचना केली जात असल्याचे या मूर्तीवरून स्पष्ट होते. दरवर्षी या पर्वताखाली असलेल्या फरसपाल या गावात 3 दिवसीय जत्रेचे आयोजन केले जाते. या दरम्यान परशुराम, ढोलकल गणपतीसह येथील स्थानिक देवी देवतांची पूजा केली जाते. ढोलकल पर्वतावरील या गणपतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या पुरातन गणपतीच्या मूर्तीवर कुठल्याही प्रकारचे छत किंवा शिखर नाही. या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी जवळपास अडीच तासांचा प्रवास करून उंच डोंगराची चढण चढावी लागते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT