सोलापूर : विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सोलापूरकरांचा उत्साह सोमवारी शिगेला पोहोचला. शहरातील सुमारे अडीच लाख घरांमध्ये घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
सकाळपासूनच गणेशमूर्ती खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत संपूर्ण कुटुंबच बाप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी बाजारपेठेत दाखल झाल्याचे चित्र शहरभर पाहायला मिळाले.
टिळक चौक, मधला मारुती, कौंतम चौक, होटगी रोड, विजापूर रोड, रेल्वे स्टेशन परिसर तसेच पूर्व भागातील गणेशमूर्ती विक्रीच्या स्टॉलवर सकाळपासूनच नागरिकांची झुंबड उडाली होती. विविध आकार, आकर्षक रूपे आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांनी स्टॉलवर गर्दी केली होती. अनेक ठिकाणी ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याने विक्रेत्यांचीही दिवसभर लगबग सुरू होती.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोलापूरच्या बाजारपेठांनाही मोठी झळाळी आली असून, गणेशमूर्तींपासून पूजेचे साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि फुलांच्या बाजारात मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र आहे. श्रद्धा, उत्साह आणि पारंपरिकतेचा संगम असलेल्या गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सोलापूरकरांनी गणरायाचे जल्लोषात स्वागत केले.
ढोल-ताशा, हलगीच्या निनादात स्वागत
गणेशमूर्ती घरी नेताना अनेक ठिकाणी ढोल-ताशा आणि हलगीच्या निनादात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत गणरायाला घरी नेण्यात आले. बाप्पाच्या आगमनामुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
सार्वजनिक मंडळे १,२०० पेक्षा जास्त
सोलापूर शहरातील नऊ मध्यवर्ती महामंडळाच्या अख्यारीत असलेल्या १,२०० पेक्षा जास्त मंडळांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. यातील काही मंडळांनी मिरवणूक काढून श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली. गेल्या वर्षी १ हजार १४७ मंडळे होती. नऊ मध्यवर्ती महामंडळाच्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. मानाच्या आजोबा गणपीच्या दर्शनासाठी सोलापूरकरांनी गर्दी केली होती. यंदा विसर्जन मिरवणुकीत दोनशेपेक्षा अधिक मंडळे सहभागी होण्याची शक्यता आहे.
बाळगोपाळांसह वयोवृद्ध मंडळीतही उत्साह
गणरायाच्या स्वागतासाठी अनेक कुटुंबांनी विशेष तयारी केली होती. घरातील बाळगोपाळांसह वयोवृद्ध मंडळीही गणेशमूर्ती घेण्यासाठी उत्साहाने बाजारात आल्याचे दिसून आले. अनेक कुटुंबे एकत्रितपणे बाप्पाला घरी घेऊन जात होती. त्यामुळे गणेशमूर्ती विक्रीच्या ठिकाणी कुटुंबांच्या गर्दीचे मनोहारी चित्र पाहायला मिळाले.
बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी
गणेशमूर्तीबरोबरच पूजेसाठी लागणारे प्रासादिक साहित्य, फुले, हार, दुर्वा, नारळ, फळे, पूजेचे साहित्य आणि सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठीही बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच गणेशोत्सवाचा उत्साह जाणवत होता.