मुलुंड : शेखर भोसले
येथील हनुमान चौकातील १९८७ स्थापन झालेले श्री केसरी मित्र मंडळ हे केवळ त्यांच्या भव्य मूर्तीसाठीच नाही, तर दरवर्षी साकारल्या जाणाऱ्या प्रसिद्ध मंदिरांच्या हुबेहूब देखाव्यांसाठीही ओळखले जाते. आत्तापर्यंत मंडळाने अनेक पौराणिक मंदिरांचे देखावे साकारले आहेत. त्यामध्ये वैष्णवी देवी, पाताल भुवनेश्वरी देवी, अमरनाथ, शिवकोंडी, रत्नागिरी दापोलीतील दाभोळ येथील चंडिका देवी अशा विविध मंदिरांचा व त्यांच्याशी संबंधित पौराणिक कथांच्या देखाव्यांचा समावेश आहे.
यंदा मंडळाने 'श्रीकृष्णाचा जन्म' ही अनोखी आणि भक्तीमय पौराणिक संकल्पना साकारली आहे. श्री केसरी मित्र मंडळ व प्रसिद्ध मूर्तिकार संदीप गजकोष यांनी संयुक्तपणे हा नेत्रदीपक देखावा तयार केला आहे.
मंडळाचे अध्यक्ष कमलाकर खापरे यांनी सांगितले की, देखावा साकारताना कैदेतील देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा झालेला जन्म, त्यानंतर मुसळधार पावसात बाळाला घेऊन पूर आलेल्या यमुना नदीतून प्रवास करत वासुदेवाने गोकूळात नेऊन सोडणे, तेथून नंदाच्या घरी त्याचवेळी जन्मलेल्या कन्येला घेऊन परत कैदेत येणे, कंसाला बाळ जन्मल्याची बातमी समजताच क्रोधित कंसाने कैदेत असलेल्या देवकीकडे येऊन तिच्या हातातील बाळ खेचणे व त्याला मारण्यासाठी हातात घेताच दैवी अवतार असलेल्या त्या बाळाने कंसाच्या हातातून निसटणे अशा प्रसंगांचा देखाव्यात सुंदर पद्धतीने चलीतचित्राद्वारे समावेश करण्यात आला आहे.
असा साकारला देखावा
देखाव्यासाठी लागलेला कालावधी : एक महिना.
कारागीर : १० कारागीर काम करत होते.
देखाव्याचा आकार : २० फूट
रुंदी, १०० फूट लांबी
उंची : २० फूट,
प्रवेश द्वाराची उंची: २० फूट