नृसिंहवाडी : दर्शन वडेर
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा वारसा जोपासला जात आहे. गेल्या ४५ वर्षांपासून शहरात मशिदीमध्ये गणरायाची मनोभावे प्रतिष्ठापना केली जाते. कुडेखान, ढेपनपूर, बैरागदार, शेळके आणि कारखाना अशा पाच मशिदीमध्ये मुस्लिम बांधव स्वतः गणपती बाप्पाची सेवा करतात.
या आगळ्या वेगळ्या परंपरेची सुरुवात १९८२ मध्ये झाली. त्यावर्षी हिंदूंचा गणेशोत्सव आणि मुस्लिमांचा मोहरम एकाच वेळी आले होते. तत्कालीन पीर-पंजा कमिटीच्या ज्येष्ठांनी एकत्र येत मशिदीत गणपतीची स्थापना केली आणि 'सर्वधर्मसमभावा'चा एक भक्कम पाया रचला. त्यांच्या पिढीजात वारसांनी ही परंपरा श्रद्धेने जोपासली आहे. २०१८ आणि २०२० मध्ये जेव्हा हे दोन्ही सण एकत्र आले, तेव्हा या शहराने पुन्हा तोच सलोखा जगाला दाखवून दिला.
उत्सवाला केवळ धार्मिक स्वरूप न देता कुरुंदवाडकरांनी त्याला सामाजिक बांधिलकीची जोड दिली आहे. या गणेशोत्सवादरम्यान दोन्ही समाजातील तरुणांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिरे, गरजू रुग्णांसाठी आरोग्य तपासणी आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. राज्यात किंवा देशात कुठेही जातीय तणाव निर्माण झाला, तरी कुरुंदवाडच्या या अभेद्य एकतेला कधीच तडा गेला नाही. मानवता व राष्ट्रीय एकात्मतेचा जो धडा कुरुंदवाडकरांनी घालून दिला आहे, तो संपूर्ण देशासाठी आदर्श आहे.
नैवेद्यातूनही जपला जातो सलोखा
कुरुंदवाडमधील हे ऐक्य प्रसादातूनही दिसून येते. मोहरमच्या वेळी हिंदू बांधव श्रद्धेने पिराला मोदकांचा नैवेद्य दाखवतात, तर गणेशोत्सवात मुस्लिम बांधव बाप्पाला रोठा, चोंगे आणि मलिद्याचा नैवेद्य अर्पण करतात. गेली ४५ वर्षे सुरू असलेली प्रसादाची ही आगळीवेगळी देवाण-घेवाण सर्वधर्मसमभावाचा गोडवा अधिकच वाढवत आहे.
मंदिर मशिदीत एका भिंतीचे अंतर
शहरातील विठ्ठल मंदिर व झारी मशिदीमध्ये अवघ्या एका मितीचे अंतर आहे. एका बाजूला अजान, तर दुसऱ्या बाजूला भजन कीर्तनाचे सूर अशा भक्तिमय वातावरणात दोन्ही समाजांच्या श्रद्धेचा आदर राखला जातो.