शनिवारी ७ सप्टेंबर रोजी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी भारतात सर्वत्र श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाईल. (File photo)
Ganeshotsav

आतुरता तुझ्या आगमनाची! जाणून घ्या गणेशमूर्ती स्थापना आणि पूजनाचा योग्य मुहूर्त

Ganesh Chaturthi 2024 | यावर्षी गणेशोत्सव १० ऐवजी ११ दिवसांचा

पुढारी वृत्तसेवा
पंचांगकर्ते मोहन दाते

शनिवारी ७ सप्टेंबर रोजी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी (Ganesh Chaturthi 2024) भारतात सर्वत्र श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५१ पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना (Ganesh Sthapana muhurat) आणि पूजन करता येईल. त्याकरिता विशिष्ट नक्षत्र, वार, योग, विष्टि करण (भद्रा) तसेच राहूकाल इत्यादी वर्ज्य नाही. शिवालिखित इत्यादी कोणतीही कोष्टके पाहण्याची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना मध्याह्नानंतरदेखील करता येऊ शकते.

Ganesh Chaturthi 2024 shubh muhurat : गणपतीची पूजा, आरती

काही जणांकडे गणेशोत्सव दीड दिवस, ५, ७ दिवस, तर काही जणांकडे अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो. आपल्याकडे जेवढ्या दिवसांचा गणेशोत्सव असेल तेवढे दिवस रोज गणेशाची सकाळी आणि संध्याकाळी पूजा, आरती अवश्य करावी. काही जणांकडे गौरी / महालक्ष्मी बरोबर गणपती विसर्जन करण्याची परंपरा असते, अशा वेळेस तो कितवाही दिवस असताना आणि कोणताही वार, नक्षत्र असताना त्या दिवशी विसर्जन करता येते. तसेच काही जणांकडे घरामध्ये गर्भवती असताना गणपती विसर्जन न करण्याची पद्धती आहे. पण ती बरोबर नाही. घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करता येते. अशा वेळेस विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या पार्थिव गणेश मूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे आणि ते पाण्यामध्ये करावे असे धर्मशास्त्र सांगते. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये, घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी.

गौरी पूजनाचा मुहूर्त

दि. १० सप्टेंबर रोजी मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर रात्री ८ वाजून ०४ मिनिटांपर्यत कधीही गौरी आवाहन करता येईल. ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावे असे असल्याने ११ सप्टेंबर रोजी बुधवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने १२ सप्टेंबर रोजी गुरुवारी रात्री ९:५३ पर्यंत गौरी विसर्जन करता येईल.

अनंत चतुर्दशी कधी?

यावर्षी १७ सप्टेंबर रोजी मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. हा गणेश स्थापनेपासून ११ वा दिवस असल्याने ज्यांच्याकडे अनंत चतुर्दशीचे दिवशी विसर्जन केले जाते; त्यांच्याकडे ११ दिवसांचा उत्सव असेल, तसेच या दिवशी मंगळवार म्हणजे गणेशाचा वार असला तरीही परंपरे प्रमाणे विसर्जन करावे, या दिवशी चतुर्दशी तिथी दुपारी पावणे बारा वाजताच संपत असली तरीही त्यानंतरदेखील विसर्जन करता येईल.

विसर्जनाच्या वेळेस गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत असतो त्याप्रमाणे पुढच्या वर्षी गणपती बाप्पा खरंच लवकर म्हणजे २७ ऑगस्ट २०२५ रोजी येणार आहेत, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT