Latest

Gadchiroli News : साडेपाच लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षल महिलांसह एका समर्थकास अटक

अविनाश सुतार

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दोन नक्षल महिलांसह एका नक्षल समर्थकास पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांवर महाराष्ट्र शासनाने साडेपाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. काजल उर्फ सिंधू गावडे (वय २८,  रा.कचलेर, ता. एटापल्ली), गीता उर्फ सुकली कोरचा (वय ३१, रा. रामनटोला, ता.एटापल्ली) अशी अटकेतील नक्षलींची, तर पिसा पांडू नरोटे (रा. झारेवाडा, ता. एटापल्ली) असे नक्षल समर्थकाचे नाव आहे. Gadchiroli News

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना हिंसक कारवाया करण्याची योजना नक्षलवादी आखत आहेत. त्यामुळे पोलिस ठिकठिकाणी नक्षलविरोधी अभियान राबवीत आहेत. असेच अभियान राबवीत असताना सी-६० पथक, पिपली बुर्गी येथील पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांनी काजल आणि गीता यांना जवेली येथील जंगलातून अटक केली. पिसा नरोटे या नक्षल समर्थकास गिलनगुडा जंगलातून अटक करण्यात आली आहे. काजल आणि गीता यांच्यावर प्रत्येकी २ लाख, तर पिसा नरोटेवर दीड लाख रुपयांचे बक्षीस महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. Gadchiroli News

Gadchiroli News  : फुलकोडो, खोब्रामेंढा आणि मोरचूल येथील चकमकीत सहभाग

काजल गावडे ही २०१२ मध्ये नक्षल्यांच्या प्लाटून क्रमांक ५५ ची सदस्य झाली. २०१९ पर्यंत ती तेथे कार्यरत होती. पुढे २०२० पर्यंत ती कंपनी क्रमांक ४ मध्ये सक्रीय होती. त्यानंतर ती स्टॉफ टीम व प्रेस टीमची विभागीय सदस्य म्हणून कार्यरत होती. २०१९ मध्ये नरकसा, दराची व बोधीनटोला येथील चकमकी, २०२० मधील किसनेली, २०२१ मधील फुलकोडो, खोब्रामेंढा आणि मोरचूल येथील चकमकीत तिचा सहभाग होता. शिवाय २०१९ मध्ये कनेली आणि पुसेर जंगलात स्फोटके दडवून ठेवण्यातही ती प्रत्यक्ष सहभागी होती.

गीता कोरचा ही २०१८ मध्ये भामरागड दलमची सदस्य झाली. त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये अबुझमाड एरियात तिची बदली करण्यात आली. २०१९ मध्ये मोरोमेट्टा-नेलगुंडा, २०२० मध्ये कोपर्शी-पोयारकोठी आणि २०२१ मध्ये कोपर्शी जंगलात झालेल्या चकमकीत ती सहभागी होती. २०२० मध्ये कोठी येथे पोलिस जवान आणि २०२१ मध्ये कोठी-भामरागड मार्गावर एका नागरिकाच्या हत्येत तिचा सहभाग होता.

पिसा नरोटे हा २०१८ पासून नक्षल्यांना वेगवेगळ्या कामात सहकार्य करायचा.

अटकेतील तिसरा नक्षल समर्थक पिसा नरोटे हा २०१८ पासून नक्षल्यांना वेगवेगळ्या कामात सहकार्य करायचा. २०२१ मध्ये तो जनमिलिशिया कमांडर झाला. २०२२ मध्ये झारेवाडा आणि गोरगुट्टा येथील इसमांच्या हत्येत त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. तसेच २०२३ मध्ये टिटोडा येथील पोलिस पाटलाचा खून करण्यातही तो सहभागी होता. शिवाय २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान टिटोडा येथे स्फोटके पुरवून ठेवण्यात त्याचा सहभाग होता, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी ७७ नक्षल्यांना अटक केली आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पालिस अधीक्षक यतीश देशमुख, कुमार चिंता, एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय राखीव दलाचे सहायक कमांडंट मोहितकुमार, दीपक दास, पिपली बुर्गी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वैभव रुपवते, गट्टा जांभिया पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी चेतन परदेशी आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT