'जी-20' शिखर परिषदेत जागतिक स्तरावर आव्हानांवर चर्चा केली जाईल. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली दरी दूर करण्यासही मदत होणार आहे. जागतिक स्तरावरील विस्कळीत अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी विकसित आणि विकसनशील देश ठोस उपाययोजना करतील, अशी आशा आहे.
या समूहातील देशांमध्ये आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी या परिषदेची स्थापना 1999 साली करण्यात आली आहे. मध्यम उत्पन्न असणार्या विकसनशील देशांच्या प्रगतीसाठी या परिषदेत धोरणे आखली जातात. मंत्री परिषदा आणि कार्यकारी गटात चर्चा झालेल्या मुद्द्यांवर या शिखर परिषदेत चर्चा होईल. त्यानंतर संयुक्त अजेंडा तयार केला जाईल. सर्व देशांची सहमती मिळाल्यानंतर संयुक्त जाहीरनामा काढला जाईल. कोव्हिडनंतरच्या अस्थिरतेनंतरच्या काळात जगातील देशांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह, जागतिक बँकेकडून कर्ज पुरवठ्याच्या नियमावलीवर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय हरित ऊर्जा, वातावरणीय बदल, अन्नसुरक्षा, जागतिक तापमान वाढ, जैव इंधन, व्यापार आदी महत्त्वपूर्ण विषयही कार्यक्रम पत्रिकेवर असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्युत रोषणाईने उजळलेल्या भारत मंडपम्चे फोटो 'एक्स' या सोशल साईट्सवरून शेअर केले आहेत. संमिश्र धातूंपासून बनविलेल्या नटराजाच्या भव्य मूर्तीचाही या छायाचित्रात समावेश आहे. मोदी यांनी 'नमस्ते' असे संबोधित आपल्या 'एक्स'(आधीचे ट्विटर)वरील प्रोफाईलवरही हा फोटो ठेवला आहे. उद्यापासून भारत मंडपम्मध्ये या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य संकुलात जी-20 परिषद सुरू आहे. अमेरिकेेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक, फुमिओ किशिदा आदींसह अन्य देशांतील राष्ट्रप्रमुख या परिषदेस हजर राहणार आहेत.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक हे भारतीय वंशाचे आहेत. त्यांची पत्नी अक्षता मूर्ती याही मूळ भारतीयच आहेत. सुनाक यांच्यासोबत अक्षता यांचेही भारतात आगमन झाले आहे. सुनाक यांना भारताचे जावई म्हणूनही ओळखले जाते. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या अक्षता या कन्या आहेत. भारत आपल्यासाठी डिअर (प्रिय) आणि निअर (घनिष्ट) आहे, अशी भावना सुनाक यांनी आगमनानंतर व्यक्त केली.
अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट एल. येलेन यांनी भारतासोबत अधिक द़ृढ आणि घट्ट संबंध प्रस्थापित करण्याबाबत जी-20 परिषदेदरम्यानच्या द्विपक्षीय चर्चेत सहमती दर्शविण्यात येणार असल्याची माहिती दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार असून, या पुढील काळात दोन्ही देशांतील संंबंध नव्या उंचीवर नेण्यात येतील, असेही येलेन यांनी सांगितले.
नवी दिल्ली : जी-20 बैठकीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टिलीना जॉर्जियेव्हा यांचे राजधानी दिल्लीत आगमन झाले. विमानतळावर लोकसंगीताच्या तालावर त्यांचे कलावंतांनी स्वागत केले. संबलपुरी गीताचा ठेका त्यांना एवढा भावला की, त्यांनी त्यावर ताल धरत चक्क नृत्य केले. त्यांच्या या नृत्याचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या परिषदेत उपस्थित राहणार नाहीत. रशियाचे परराष्ट्र मंत्री आणि चीनचे पंतप्रधान या परिषदेत उपस्थित राहणार आहेत. याबाबत बोलताना अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट एल. येलेन म्हणाल्या की, भारताच्या पुढाकारामुळे जी-20 परिषदेने शाश्वत विकासासाठी ठोस पावले उचलली आहेत. त्यामुळे ही शिखर परिषद यशस्वी करण्यासाठी अमेरिकेचे पूर्ण सहकार्य राहणार आहे. जागतिक स्तरावर जी-20 परिषदेचे स्थान मोठे आहे. भारताच्या यजमान पदाखाली या परिषदेने जोमाने काम केले आहे. बर्याच समस्यांवर या परिषदेतील अन्य देशांमध्ये एकमत झाले आहे, असे सांगून त्यांनी पुतीन आणि जिनपिंग यांच्या अनुपस्थितीच्या मुद्द्याला अनुल्लेखाने मारले.
जी-20 परिषदेचे यजमानपद भारताने उत्कृष्टपणे पार पाडले आहे. भारताच्या नेतृत्वाखालील परिषदेत राजकीय मतभेद दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास आहे. काही देशांमध्ये मतभेदाची दरी निर्माण झाली असली तरी भारतातील परिषद फलदायी आणि निर्णायक ठरेल.
– अँटोनिओ गुटरेस, संयुक्त राष्ट्र सरचिटणीस