Latest

‘जी-20’ परिषद : जागतिक नेत्यांच्या सुरक्षेसाठी 24 हजार जवान

मोहन कारंडे

बाली; वृत्तसंस्था : जो बायडेन, शी जिनपिंग, नरेंद्र मोदी यांच्यासारखे जगातील शक्तिशाली राष्ट्रप्रमुख व इतर मान्यवर 'जी-20' संमेलनासाठी बालीत दाखल होत असून, इंडोनेशियाने संमेलनस्थळी व राष्ट्रप्रमुख उतरणार असलेल्या ठिकाणी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. तब्बल 24 हजार पोलिस, लष्करी पथके, विशेष कृती दलांचे जवान आणि दहशतवादविरोधी पथके तैनात करण्यात आली आहेत.

दहशतवादी कारवाया आणि हल्ले यांचा इतिहास असलेल्या मुस्लिमबहुल इंडोनेशियाने जागतिक नेत्यांच्या सुरक्षेसाठी काटेकोर खबरदारी घेतली आहे. सोमवारपासून जागतिक नेते इंडोनेशियात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. आसियान परिषद आटोपून जो बायडेन दाखल झाले आहेत. पाठोपाठ शी जिनपिंग व नरेंद्र मोदीही दाखल झाले.

असा आहे बंदोबस्त…

24 हजार तगड्या आणि लढाऊ जवानांच्या सोबतीला 13 हेलिकॉप्टर आणि फायटर जेटचा ताफा हवाई दलाने तैनात केला असून, संपूर्ण बेट आणि संमेलन होत असलेल्या रिसॉर्टवर ते घिरट्या घालणार आहेत. याशिवाय सुरक्षेसाठी इंडोनेशियन नौदलाची 10 जहाजे किनार्‍यालगत समुद्रात तळ ठोकून असणार आहेत. याशिवाय त्सुनामी आणि भूकंप या नैसर्गिक आपत्ती इंडोनेशियात सातत्याने होत असतात, त्यामुळे अशा आपत्तींना तोंड देण्यासाठीही परिपूर्ण तयारी करण्यात आली आहे. संमेलन 15 आणि 16 तारखेला होत असले, तरी चार दिवस आधीपासूनच वाहतूक बदल, निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

संशयितांवर कडक नजर

मुस्लिमबहुल असलेल्या इंडोनेशियात 'अल-कायदा' व 'इसिस' समर्थक दहशतवादी गट अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यामुळे संमेलनात घातपात होऊ नये, यासाठी टोकाची सतर्कता बाळगण्यात आली आहे. मागील सहा महिन्यांपासून इंडोनेशियन गुप्तचर यावर काम करत असून, संशयितांवर नजर ठेवणे, काहींना ताब्यात घेणे आदी मोहिमा सतत सुरू आहेत.

कसूर करू नका : विडोडो

इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी गेल्या आठवड्यात जी- 20 तयारीचा आढावा घेतला. तेव्हा 20 देशांपैकी 17 देशांचे राष्ट्रप्रमुख व इतर पाहुण्या देशांचे राष्ट्रप्रमुख तसेच सर्वच देशांतील महत्त्वाचे मंत्री, अधिकारी आणि इतर क्षेत्रांतील मान्यवर येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेत कोणतीही कसूर केली जाणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी लष्कर व पोलिस दलाला केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT