मुंबई : पुढारी वृत्तसेवा : गरीब क्रिकेटपटूसाठी स्पॉन्सरशीपच्या नावाने कोट्यवधी रुपयांची फसवणुक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. आंधप्रदेशचा माजी रणजी क्रिकेटपट्टू असलेल्या नागराजू आप्पलास्वामी बुडूमुरु या रेकॉर्डवरील ठगाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध आंधप्रदेश आणि तेलंगणात फसवणुकीचे तीसहून अधिक गुन्ह्यांची नोंद असून त्याने आतापर्यंत साठहून अधिक कार्पोरेट कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकारी व त्यांच्या मालकांकडून तीन कोटी रुपये उकळल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी ७ लाख ६६ हजार रुपये विविध बँक खात्यात गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे.
नागराजू हा फसवणुकीसाठी आंधप्रदेश आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा वापर करत होता. एका खाजगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने तक्रार केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. या अधिकाऱ्याची कंपनी देशभरातील सर्व शहरात इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्री करते. काही दिवसांपूर्वी त्यांना एका व्यक्तीने फोन करुन तो आंधप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांचा पीए नागेश्वर रेड्डी बोलत असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांना त्यांच्या एमडीशी बोलायचे आहे असे सांगितले. मुख्यमंत्र्यांचा मोबाईल क्रमांकही दिला. त्यांनी त्या क्रमांकावर फोन केला असता पलीकडून जगमोहन रेड्डी बोलत असल्याचे सांगण्यात आले. क्रिकेटपट्ट रिकी भाईला क्रिकेट किट घेण्यासाठी बारा लाख रुपये एका बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. ही रक्कम पाठविल्यांनतर तक्रारदारांनी शहानिशा केली असता आपली फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी सायबर सेलकडे तक्रार केली.
सायबर सेलच्या विशेष पथकाने आंधप्रदेशातून नागराजूला ताब्यात घेतले. नागराजूने आंधप्रदेश, तेलंगणातील सुमारे ६० विविध कार्पोरेट कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधून गरीब रणजी क्रिकेटपटूसाठी प्रायोजकत्व मागितल्याचे उघडकीस आले. असे तीन कोटी रुपये त्याने आतापर्यंत उकळले. मुख्यमंत्री स्वत: कॉल करत असल्याने संबंधित अधिकारी त्यांच्या भुलथापांना बळी पडत होते.