सीन-सेंट-डेनिस (फ्रान्स) : पुढारी ऑनलाईन; फ्रान्समधील नॅनटेरे येथे पोलिसांच्या गोळीबारात एका १७ वर्षाच्या किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात हिंसाचार उसळला आहे. मुलाच्या मृत्यूची घटना मंगळवारी घडली होती. घटनेनंतर फ्रान्समधील रस्त्यावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संतप्त आंदोलकांनी देशभरातील शाळा, टाऊन हॉल आणि पोलिस स्थानकांना लक्ष्य केले आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. ऑबेरविलियर्समधील राज्य परिवहन (RATP) बस डेपोच्या किमान १३ बसेस पेटवून दिल्या आहेत. याबाबतचे वृत्त BFM टीव्हीने दिले आहे. (France violence)
पॅरिसच्या बाहेरील भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून शहरातील बस सेवा रात्रीच्या वेळी बंद ठेवण्यात आल्या आहेत. वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यानंतर १७ वर्षीय मुलाला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला होता. पण तो न थांबल्याने त्याच्यावर पोलिसांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यात त्याचा मृत्यू झाला. वाहन चालवल्यानंतर काही वेळातच या तरुणाचा अपघात झाला. पोलिसांनी त्याच्यावर जवळून गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्याने गोळी झाडली त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मृत मुलाच्या आईच्या आवाहनावर ६ हजारहून अधिक लोक नॅनटेरे येथील आंदोलनात सहभागी झाले होते.
मृत मुलाची आई मॉनिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटले होते की, तिच्या मुलाचा मृत्यू झाला असून लोकांनी त्याच्या स्मरणार्थ काढलेल्या निदर्शनात सहभागी व्हावे. "तो अजून लहान होता. त्याला आईच्या सावलीची गरज होती. सकाळी निघताना त्याने मला, आय लव यू मॉम, असे म्हटले होते. एक तासानंतर मला सांगण्यात आले की त्याला गोळी मारण्यात आली. मी आता काय करू तो माझे जीवन होता. तो माझा सर्वस्व होता." अशा भावना तिने व्यक्त केल्या.
त्यानंतर सगळीकडे हिंसाचार उफाळला. लुटालूट, जाळपोळ आणि फटाके फोडल्यामुळे पॅरिस आणि उपनगरांतील परिस्थिती हाताबाहेर गेली. फ्रान्सच्या उत्तरेकडील लिले शहरातही आंदोलकांची पोलिसांशी झटापट झाली. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पश्चिमेकडील रेने शहरात सुमारे ३०० लोक पोलिसाच्या गोळीबारात मारल्या गेलेल्या तरुणांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र जमले होते. यातील काही संतप्त लोकांनी जाळपोळ केली. मात्र, पोलिसांनी त्यांना पांगवले. अनेक ठिकाणी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला.
आत्तापर्यंत संपूर्ण फ्रान्समध्ये निदर्शने करणाऱ्या सुमारे ४२१ लोकांना अटक करण्यात आली आहे, असे फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड दरमनिन यांनी CNN शी संलग्न असलेल्या बीएफएमटीव्हीशी बोलताना सांगितले.
त्यापैकी २४२ जणांना पॅरिस परिसरातील हॅट्स-डी-सीन, सीन-सेंट-डेनिस आणि व्हॅल-डी-मार्ने विभागांमध्ये अटक करण्यात आल्याचे असे वृत्त बीएफएमटीव्हीने पॅरिस पोलिसांचा हवाल्याने दिले आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (French President Emmanuel Macron) यांनी गुरुवारी ट्विट करत म्हटले आहे की, "पोलीस स्थानके, शाळा, टाऊन हॉल्स यांना लक्ष्य करणे चुकीचे आहे. पुढील काही तासांत शांततेच्या मार्गाने लोकांची समजूत घालायला हवी." या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गुरुवारी वरिष्ठ मंत्र्यांसोबत तातडीने बैठकही घेतली, असे वृत्त सीएनएनने दिले आहे.
किशोरवयीन मुलाने जीवे मारण्याच्या उद्देशाने वाहन चालवले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी त्याची गाडी थांबवल्याचे व्हिडिओ फुटेजमध्ये दिसून आले आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे आंदोलकांनी अनेक वाहने पेटवून दिली आहेत. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी या घटनेला अक्षम्य म्हटले आहे. (France violence)
हे ही वाचा :