Latest

खुशखबर! भारतात iPhone 15 चे उत्पादन सुरू

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Apple सप्लायर फॉक्सकॉन कंपनीने (Apple Supplier Foxconn) भारतातील तमिळनाडूमध्ये iPhone 15 चे उत्पादन सुरू केले आहे. याबाबत 'द इकॉनॉमिक टाईम्स'ने आपल्या वेबसाईटवर याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. कंपनीने नुकतीच तेलंगणातील त्यांची गुंतवणूक 550 दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढवली होती. आता iPhone 15 चे उत्पादन सुरू करून कंपनीने भारतातील ऑपरेशन्स आणि चीनमधील मॅन्युफॅक्चरिंग बेस यामधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

आयफोनच्या निर्मितीसाठी अॅपल चीनवर अवलंबून होते. परंतु अॅपलला आता चीनमधील उत्पादन पूर्णपणे कमी करायचे आहे. अशातच अॅपलने भारताला पसंती दिली असून तामिळनाडू येथे प्लांट उभारला आहे. तिथून आता आयफोन 15 चे उत्पादन सुरू झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यावर्षी सप्टेंबर महिन्यात युजर्ससाठी आयफोन 15 सीरिज उपलब्ध होईल असे समजते आहे. त्यामुळे अॅपलकडून नवीन अपडेट्स येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

भारत Apple ची 5 वी सर्वात मोठी बाजारपेठ

भारतात अॅपल कंपनीच्या उत्पादनांना असलेल्या मागणीत वाढ झाली आहे. प्रामुख्याने आयफोनची मागणी वाढली आहे. देशातील आयफोनच्या विक्रीत मागील काही महिन्यांत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. एका रिसर्च फर्मच्या अहवालानुसार, यंदाच्या आर्थिक वर्षाच्या जूनच्या शेवटच्या तिमाहीत भारत अ‍ॅपलची 5 वी सर्वात मोठी बाजारपेठ झाला आहे. भारत जर्मनी आणि फ्रान्सला मागे टाकून 5 व्या स्थानावर पोहोचला आहे. अमेरिका, चीन, जपान आणि ब्रिटन हे देश भारताच्या पुढे आहेत.

अहवालानुसार 2023च्या दुसऱ्या तिमाहीत भारतात आयफोनच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची चिन्हं आहेत. आयफोन सेलमध्ये वर्षभरात 50 टक्के वाढ झाली. यात भारताचा वाटा सातत्याने वाढत आहे. मागच्या वर्षी (2022) पर्यंत भारताचा आयफोन विक्रीतील वाटा 3.4 टक्के होता. पण यंदाच्या वर्षी (2023) भारताचा आयफोन विक्रीतील वाटा 5.1 टक्के झाला आहे.

अलिकडेच दिल्ली आणि मुंबईत प्रत्येकी 1 अॅपल स्टोअर सुरू झाले आहे. या व्यतिरिक्त संपूर्ण देशात अॅपलच्या फ्रँचायझी कार्यरत आहेत. आयफोनची विक्री या सर्व दुकानांतून तसेच ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून सुरू आहे. अॅपल कंपनीला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नातील 15 टक्के वाटा भारताचा होऊ शकतो. पण यासाठी किमान 3 ते 5 वर्षांचा कालावधी लागेल, असा अंदाज संशोधनातून व्यक्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT