पुढारी ऑनलाईन डेस्क : राधानगरी धरणाचा चौथा स्वयंचलित दरवाजा आज (दि.१०) दुपारी ३.२० वाजता उघडला. याचबरोबर धरणाचे एकूण 4 दरवाजे खुले झाले आहेत. यात 3,4,5,6 या क्रमांकाच्या दरवाजांचा समावेश आहे. चार दरवाज्यातून 5712 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावतीत नदीत सुरू आहे. तसेच पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एकूण विसर्ग 7312 क्युसेक सुरू आहे.
राधानगरी धरणाचा चौथा स्वयंचलित दरवाजा उघडला असून धरणातून एकूण 7312 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचे तीन चार पाच व सहा असे चार दरवाजे खुले झाल्याने पंचगंगेच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. पंचगंगेची पातळी संत गतीने वाढत असून दुपारी पाणी पातळी चाळीस फूट नऊ इंचावर केली होती. धोका पातळी गाठण्यासाठी सुमारे सव्वा दोन पातळी कमी आहे. पंचगंगा धोका पातळी गाठण्याच्या शक्यतेने जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे.
चिखली येथील 467 कुटुंबांचे आज स्थलांतर करण्यात आले. यासह जनावरेही सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहेत. कोल्हापूर शहरातील ही पूरग्रस्त भागातील कुटुंबांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने कोल्हापूर – पन्हाळा मार्गावरील वाहतूक बंद केली असून केर्ली, गायमुख- वाघबीळ अशी वळवण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच वाढल्यास धरणाचे आणखी दरवाजे खुले होण्याची शक्यता असून नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपअभियंता प्रवीण पारकर यांनी केले आहे.