Latest

अहमदनगर जिल्ह्याचे चार सुपुत्र भारतीय प्रशासकीय सेवेत

अमृता चौगुले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील रहिवासी तसेच अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, गुलाबराव खरात, सतीश खडके आणि विकास पानसरे यांची सेवाज्येष्ठतेनुसार भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली आहे. या अधिकार्‍यांना लवकरच जिल्हाधिकारी हे प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च पद भूषविण्याचा मान मिळणार आहे. विशेष म्हणजे हे चारही आयएएस अधिकारी कृषी पदवीधर आहेत.
गाडीलकर हे पारनेर तालुक्यातील असून, 1996 मध्ये उपजिल्हाधिकारीपदी रुजू झाले.

त्यांनी अहमदनगर येथे जिल्हा पुनर्वसन अधिकारी, रोहयो उपजिल्हाधिकारीपदी काम पाहिले. बुलडाणा येथे निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती येथे भूसंपादन, तर मोर्शी येथे प्रांताधिकारी म्हणूनही काम पाहिले. जळगाव येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून काही काळ त्यांनी काम पाहिले. गाडीलकर सध्या नागपूर व धुळे येथील जातपडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

गुलाबराव खरात हे नेवासा तालुक्यातील भेंडा येथील रहिवासी असून, ते गेल्या 25 वर्षांपासून महसूल विभागात कार्यरत आहेत. अहमदनगर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. पदोन्नतीनंतर त्यांनी सुरवातीला नंदुरबार, नंतर जळगावला अपर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. काही काळ ते पुणे येथे शेती महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते. 2016नंतर खरात यांना अमरावती, बुलढाणा, जळगाव आणि धुळे आदी ठिकाणी जिल्हा जातपडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहण्याची संधी मिळाली होती.

आयएएस म्हणून निवड झालेले सतीश खडके जिल्ह्यातील चिचोडी पाटील येथील रहिवासी आहेत. 1995मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेले खडके सध्या सिडकोचे अपर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी सुरवातीला विक्रीकर अधिकारी म्हणून, नंतर जळगावचे प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले. नाशिक महापालिकेतही ते कार्यरत होते. पिंपरी-चिंचवड प्राधिकरणचे मुख्य अधिकारी म्हणूनही त्यांनी कामकाज सांभाळले.

सध्या अहमदनगर जिल्हा जातपडताळणी समितीचे अध्यक्ष असलेेले विकास पानसरे संगमनेर तालुक्यातील रहिवासी असून, त्यांनी बारा वर्षांपूर्वी अहमदनगर येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले होते. एकाच वेळी जिल्ह्यातील या तिघांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT