न्यूयॉर्क : रागाने मोठीच हानी होत असते. मात्र, काही लोकांना साध्या साध्या गोष्टींवरून चिडचिड करण्याची, आकांडतांडव करण्याची सवय असते. अशा शीघ्रकोपी लोकांना शांत राहण्यासाठी काय करावे, असा प्रश्न पडलेला असतो. आता एका प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञांनी यासाठी 'रुल-12' फॉर्म्युला आणला आहे, जो चांगलाच लोकप्रियही ठरत आहे. हा फॉर्म्युला वापरला तर राग येणे दूरच, तुम्ही कधीच चिडणार नाही, असे म्हटले जाते.
अमेरिकेचे डॉ. डॅनियल आमीन यांनी हा फॉर्म्युला तयार केला आहे. ते स्वतःही त्याचे पालन करतात. ते म्हणाले की, तुम्ही हे ठरवा की, दिवसातून बारा गोष्टी चुकीच्या होईपर्यंत तुम्ही शांत राहाल आणि त्यानंतरच आपला संताप व्यक्त कराल. हे एक मनोविज्ञान आहे. याचे कारण हे तुम्ही तुमच्यासाठी ठरवलेले आहे. जसे की, तुम्हाला ऑफिसमधून सुट्टी मिळाली नसेल, रस्त्यावरून जात असताना काही समस्या आली असेल, कुणासोबत मतभेद झाले असतील तरी तुम्ही शांत राहाल.
ते म्हणतात की तेराव्या चुकीची वाट पाहण्याची वेळच येणार नाही. याचे कारण हळूहळू मन शांत राहण्यास तयार होऊ लागते आणि एक दिवस असा येतो की सतत चिडचिड करण्याची सवय दूर होते. त्यामुळे हायपरटेन्शन, मधुमेहासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवणेही सोपे होते. डॉ. आमीन म्हणाले, मी अनेक वर्षांपासून हा फॉर्म्युला पाळत आलो आहे. कधीही सहापेक्षा अधिक चुका समोर आल्या नाहीत, त्यामुळे तेराव्या चुकीची शक्यताच दूर राहिली!