पुढारी ऑनलाईन डेस्क : Dean Elgar vsVirat Kohli : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीबाबत वादग्रस्त विधान केले आहे. यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. एल्गरने 2015 मध्ये खेळल्या गेलेल्या मोहाली कसोटीचा संदर्भ गंभीर धक्कादायक आरोप केले आहेत. त्याने म्हटलंय की, विराट कोहली माझ्यावर थुंकला होता. इतकंच नाही तर त्याने मला खूप शिवीगाळही केली. पण मी त्याला चोख प्रत्युत्तर दिले.' बेटवे साऊथ आफ्रिका (Betway South Africa) यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान एल्गरने हा खुलासा केला आहे. त्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एल्गरने या महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने शेवटचा सामना भारताविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यानंतर कोहलीने आपला ऑटोग्राफ केलेला टी-शर्ट एल्गरला भेट देऊन या द. आफ्रिकन खेळाडूचा सन्माम केला होता. मात्र, एल्गरने आपल्या निवृत्तीला एक महिनाही उलटलेला नाही तोच वादग्रस्त विधान केले आहे, ज्यामुळे कोहलीच्या चाहते चांगले संतापले आहेत. (Dean Elgar vsVirat Kohli)
दक्षिण आफ्रिकेचा संघ 2015 मध्ये चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता. कर्णधार म्हणून घरच्या मैदानावर कोहलीची ही पहिलीच कसोटी मालिका होती. पहिला सामना मोहालीत खेळला गेला. त्या सामन्यात भारताने 108 धावांनी विजय मिळवला होता. तर मालिका 3-0 ने जिंकली होती.
एल्गरने यूट्यूब चॅनलवरील संभाषणात म्हटलंय की, 'मालिकेतील पहिली कसोटी मोहाली येथे खेळली गेली. त्या मैदानावरील खेळपट्टीवरून विनोद केले जात होते. रविचंद्रन अश्विनविरुद्ध फलंदाजी करताना मला लय कायम ठेवायची होती. याचदरम्यान, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा माझ्यावर थुंकले. तसेच त्यांनी मला शिवीगाळही केली. त्यावर मी दोघांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. त्यांनी पुन्हा असे कृत्य केले तर मी त्यांना बॅटने चोप देईन अशी धमकी दिली,' असा खुलासा त्याने केला आहे.
एल्गरने पुढे सांगितले की, 'भारतीय संघ 2017-18 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर आला होता. त्यादरम्यान कोहलीने मोहालीच्या सामन्यतील त्याच्या गैरवर्तनाबद्दल माझी माफी मागितली. त्याने मला ओढत बाजूला नेले आणि मालिकेनंतर आपण भेटून ड्रिंक घेऊया का? मला माझ्या कृतीबद्दल माफी मागायची आहे. आम्हा दोघांमधील कटूता संपवण्यासाठी मी विराटची ती ऑफर स्विकारली. मालिका संपल्यानंतर आम्ही एकत्र भेटलो. निवांत वेळ व्यतीत केला. त्या रात्री आम्ही पहाटे तीन वाजेपर्यंत ड्रिंक घेत राहिलो.'