मुंबई, वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नव्या निवड समितीचे अध्यक्षपद व्यंकटेश प्रसादकडे जाण्याची दाट शक्यता आहे. ज्या लोकांनी नव्या निवड समिती सदस्यपदासाठी अर्ज केला आहे त्यात सर्वाधिक चांगली प्रोफाईल व्यंकटेश प्रसाद याचीच आहे. नव्या निवड समितीमध्ये एक टी-20 स्पेशालिस्ट सदस्यदेखील निवडायचा आहे.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद 53 वर्षांचा आहे. त्याने भारताकडून 33 कसोटी आणि 161 वन-डे सामने खेळले असून 290 आंतरारष्ट्रीय विकेटस् घेतल्या आहेत. तो नव्या निवड समितीसाठी अर्ज केलेल्यांपैकी सर्वात अनुभवी माजी खेळाडू आहे.
व्यंकटेश प्रसाद हा सर्वात अनुभवी माजी क्रिकेटपटू आहे. अजून त्याच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही. तथापि, प्रसादच्या निवड समिती अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होणे ही केवळ औपचारिकता असल्याचे मंडळातील सूत्राने सांगितले.
संभाव्य निवड समितीत प्रसाद दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व करेल. पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व सलील अंकोला करण्याची शक्यता आहे. याचबरोबर पूर्व विभागाचे शिवसुंदर दास, उत्तर विभागातून मनिंदर सिंग, अतुल वासन, निखिल चोप्रा यांची नावे चर्चेत आहेत. मध्य विभागातून नयन मोंगियाचे नाव चर्चेत आहे.