Latest

Eoin Morgan : इंग्लंडच्या इयॉन मॉर्गनची क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Eoin Morgan Retirement  : इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने ट्विटरवरून याची माहिती दिली. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2019 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. त्याने गेल्या वर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

मॉर्गनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 16 शतके आणि 64 अर्धशतकांसह 10,858 धावा केल्या. तो एकदिवसीय (6,957) आणि टी-20 आंतरराष्ट्रीय (2,458) सामन्यात इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

मॉर्गनने ट्विटमध्ये म्हटले की, 'क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून मी निवृत्ती घेत आहे. ही गोष्ट जाहीर करताना मला खूप अभिमान वाटतो आहे. खूप विचार केल्यानंतर मला वाटले की खेळापासून दूर जाण्याची हीच योग्य वेळ आहे. गेल्या काही वर्षांत या खेळाने मला खूप काही दिले आहे. मी प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला आहे.'

तो पुढे म्हणाला, 'प्रत्येक खेळाडूप्रमाणे माझ्या कारकिर्दीतही चढ-उतार आले. पण या काळात माझे कुटुंबिय आणि मित्रांनी प्रोत्साहन देत मला नेहमीच सकारात्मक ठेवले. यासाठी पत्नी तारा, माझे इतर कुटुंबिय आणि मित्रांचे मी विशेष आभार मानू इच्छितो. माझे सर्व सहकारी, प्रशिक्षक, चाहते आणि ज्यांनी पडद्यामागे राहून मला केवळ खेळाडूच नाही एक चांगली व्यक्ती बनवण्यात मोलाची भूमिका बजावली त्यांनाही मी विसरणार नाही. त्यांचेही आभार.' (Eoin Morgan Retirement)

मॉर्गन एक खेळाडू म्हणून क्रिकेटपासून दूर गेला असला तरी तो खेळाशी जोडलेला राहील. त्याने आपल्या पोस्टच्या शेवटी म्हटले आहे की, मी माझी खेळण्याची कारकीर्द संपुष्टात आणत आहे, परंतु खेळाशी संबंध कायम राहील. मी समालोचक म्हणून आंतरराष्ट्रीय आणि फ्रेंचायझी स्पर्धांमध्ये कार्यरत राहिन. विशेष म्हणजे, मॉर्गनने 126 सामन्यांमध्ये इंग्लंडचे नेतृत्व केले, ज्यामध्ये त्याने 76 जिंकले आणि या वेळी त्याची विजयाची टक्केवारी 65.25 होती. (Eoin Morgan Retirement)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT