पुणे : विदेशी मुळाच्या वनस्पती व झाडांनी भारतीय वंशांची जैवविविधता बिघडवली आहे. यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याचेही काही पर्यावरणतज्ज्ञ सांगतात. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांच्याशी
दै. 'पुढारी'चे प्रतिनिधी सुनील जगताप यांनी संवाद साधला व त्यांची भूमिका जाणून घेतली.
परकीय वृक्षांमुळे जैवविविधता धोक्यात येते असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे; कारण सुबाभूळसारख्या विदेशी वृक्षामुळे ग्रामीण भागात जळणासाठी लाकूड उपलब्ध होते. पर्यायाने जंगलात होणारी वृक्षतोड कमी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे परकीय वृक्षांमुळे जैवविविधता धोक्यात येत नाही, असे मुरुमकर यांनी स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्र संघाने जैवविविधतेच्या समस्यांबद्दलची समज आणि जागरुकता वाढवण्याच्या उद्देशाने दरवर्षी 22 मे हा जैवविविधता आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर जगभरात जैवविविधतेचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केले जातात.
प्रजाती अंतर्गत, प्रजाती-प्रजातींमधील आणि परिसंस्थांमधील विविधतेचा जैवविविधतेमध्ये समावेश होत असतो. पृथ्वीवरील बरीचशी जैवविविधता ही विषुववृत्ताभोवती उष्णकटिबंधीय व उप-कटिबंधीय प्रदेशांमध्ये एकवटलेली आहे. विषुववृत्तावर सर्वात जास्त विविधता आढळते आणि ध्रुवाकडे कमी-कमी होत जाते. अशा वैविध्यपूर्ण प्रजातींबद्दल डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी माहिती दिली.
प्रश्न : स्थानिक वृक्षांचे प्रमाण कमी का?
डॉ. मुरुमकर : आपल्या भारतामध्ये विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट केली जात आहे. दुसर्या बाजूला स्थानिक वृक्षांची संख्या अधिक आहे परंतु, त्यांचा वाढण्याचा वेग कमी आहे. आपण त्यांना अपेक्षित वेळ देत नाही, तर दुसर्या बाजूला परकीय वृक्षांचा पसरण्याचा वेग अधिक असतो. त्यामुळे परकीय वृक्षांबाबत उपद्रवी अथवा अतिक्रमण करणारे असे लेबल न लावता, दुसर्या बाजूने उपयोगी वृक्ष म्हणूनही त्यांच्याकडे पाहावे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात पॉप्लुलर नावाची परकीय वृक्षांची मोठी बाग असते. निलगिरीच्या वृक्षांचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असेल तर त्याचे महत्त्वही लक्षात घेणे आवश्यक आहे.
प्रश्न : परकीय वृक्षांमुळे स्थानिक वृक्षांना फटका बसतो का?
डॉ. मुरुमकर : स्थानिक वृक्ष लागवड झालेली नसेल तर तेथे कोणत्याही प्रकारचे तण निर्माण होते. या उगवलेल्या तणावर इतर जीवाश्म जगत असतात. परकीय वृक्षांमुळे स्थानिक वृक्षांना फटका बसल्याचे कोठेही आढळून आलेले नाही. परकीय वृक्षांचे कार्य निसर्गचक्राप्रमाणे सुरू असते.
प्रश्न : परकीय वृक्षांमुळे निसर्गाचा समतोल बिघडतो का?
डॉ. मुरुमकर : निसर्गाने आपली स्वतःची साखळी तयार केलेली आहे. भारतामध्ये परकीय वृक्ष जरी आढळून येत असले तरी त्यावर बाकीचे जैव घटक अवलंबून असतात. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला जात नसून, एक प्रकारे अन्नसाखळी निर्माण होत असते.