मानवी वस्तीवर वन्यजीवांच्या हल्ल्यांचे प्रकार सतत होत असतात. यात मानवासह पशुधनाचेही नुकसान होते; पण मुळात वन्यजीव जंगल सोडून बाहेर आले कसे? वने समृद्ध होतील तेव्हा वन्यजीवांचे आश्रयस्थान निश्चित होईल. अन्यथा मानवी वस्तीदेखील त्यांची वस्ती असेल हे वास्तव नाकारता येणार नाही. समृद्ध वने पृथ्वीची फुप्फुस असून तीच हळूहळू नष्ट होऊ लागल्याने वन्यजीवांचे व मानवी अस्तित्व धोक्यात येत आहे. जंगले नष्ट होऊ लागल्याने मानवी आयुर्मान घटत असून विविध रोगराई निर्माण होत आहे. ते प्रत्येक राष्ट्राने ओळखून समृद्ध वने निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर पृथ्वीचा विनाश टळेल. 2019 मध्ये ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या आगीत सुमारे 50 कोटींहून अधिक प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाला. वसुंधरा समृद्ध ठेवायची असेल, तर आपणास वणवा व्यवस्थापन, अन्नसाखळी, पाणवठे निर्माण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी वन विभागाच्या प्रयत्नात लोकसहभागही फार महत्त्वाचा आहे.
भारत हा उष्ण कटिबंधीय प्रदेश असल्याने तीनही ऋतूंचे वैशिष्ट्ये महत्त्वपूर्ण आहे. जानेवारी अखेर उन्हाच्या झळा लागू लागल्याने जंगल व डोंगर माथ्यावरील वाढलेले गवत व इतर लहान झुडपे वाळून गेली आहेत. सध्या अनेक डोंगररांगांना आगी लागत आहेत. यात अनैसर्गिक व नैसर्गिकरीत्या वणवे लागून अनेक जंगले, त्यातील अनेक उपयुक्त वनस्पती, औषधी वनस्पती, पशू, पक्षी, कीटक, नष्ट होत चालले असून ते रोखण्यासाठी केवळ वन विभाग जबाबदारी पेलू शकत नाही. नागरी सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. वन्यजीव मानवी वस्तीकडे का येऊ लागले, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अनेकदा वन्यजीव विहिरीत पडलेले दिसून येतात. अन्न व पाणी या गरजांसाठी त्यांनी हा संघर्ष केलेला असतो. वन्यजीवांनी शहरात येऊन केलेल्या हल्ल्याच्या घटना सवयीच्या होऊन जाऊ नयेत, याची काळजी घेतली पाहिजे.
समृद्ध वने निर्माण करताना अन्न साखळी व पाणवठे निर्माण करण्यासाठी वन, जंगलातील मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी नियमावली आवश्यक आहे. भारतात दरवर्षी 14 लाख हेक्टर जंगलतोड होते. त्यामुळे जंगल विकासात स्थानिक नागरिकांचा व स्वराज्य संस्थांचा सहभाग घेतला पाहिजे. भविष्यात मानवी वस्तीकडचे अतिक्रमण रोखण्यात यश येईल. जंगलात विदेशी अतिक्रमण झाले, अशा झाडांना फुले, फळे, शेंगा लगडत नसल्याने वन्य जीवांचे हक्काचे अन्न नाहीसे झाले. वारंवार लागणार्या वनव्याने अनेक औषधी व चारायुक्त वनस्पती जळून नष्ट झाल्या. त्यामुळे जैवसाखळी बिघडली. त्यातून हिंस्र प्राणी मानवी वस्तीकडे येऊ लागले. मानवी वस्तीमध्ये संचार करताना रस्ते, विहीर, कुंपण यातील अपघात, शिकार व उपासमारीमुळे अनेक प्राण्यांचे दरवर्षी मृत्यू होतात. डोंगर उतारावर पाणवठे निर्माण करताना पाणी वाहून जाणार नाही अशा पद्धतीने चर निर्माण केल्या पाहिजेत.
कृत्रिम पाणवठे निर्माण करून त्यात पाणी साठवले पाहिजे. फळ देणारी देशी झाडे लावली पाहिजेत. जानेवारी ते जूनपर्यंत जंगल भागात पाण्याचे प्रमाण कमी होत असते. त्यात जंगल भागातील पडीक जमिनीचा वापर अनेक धनदांडग्या मंडळींनी सुरू केला आहे. असा जंगलावरील मानवी अतिक्रमणाचा विळखा घातकच ठरणार आहे. हे घातक चक्र नाहीसे करावयाचे असेल, तर वन्यजीव संवर्धनाची जबाबदारी राखण्यासाठी अन्नसाखळी टिकली पाहिजे. त्यासाठी पाणवठे निर्माण करून वनसंपदा राखण्यासाठी लोकसहभाग हा हवाच आहे.
अन्न, पाण्याच्या शोधार्थ वन्यजीवांनी मानवी वस्तीकडे धाव घेतली. हे टाळण्यासाठी जंगलात पाणवठे निर्माण करून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. 3 मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा होतो. त्यानिमित्त…
– विठ्ठल वळसे-पाटील