Latest

Ashadhi Wari : अन्न व औषध प्रशासनाची आषाढी वारीत करडी नजर

दिनेश चोरगे

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारी (Ashadhi Wari) अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे. वारीत मिठाई, पेढे, भगर यासह अन्य पदार्थांत भेसळ होणार नाही यासाठी प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. आषाढी वारीत एकूण 20 जणांचे पथक तैनात करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सुनील जेटीथोर यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना दिली.

आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari) विविध जिल्हे, राज्यांतून लाखो भाविक पंढरपुरात येत असतात. वारी कालावधीत भेसळयुक्त तसेच निकृष्ट दर्जाचे अन्न मिळणार नाही यासाठी अन्न व औषध प्रशासन सज्ज आहे. विविध बैठका घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. वारीसाठी बाहेरील 15, तर अन्न व औषध प्रशासनाचे पाच अशा एकूण 20 जणांचे पथक 25 ते 30 जूनपर्यंत तैनात असणार आहे. वारीत वारकर्‍यांना चांगल्या दर्जाचे अन्न मिळावे यासाठी बारीक नजर असणार आहे. त्यामुळे प्रत्येक पालखी मार्गांवर अन्नाचे नमुने घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पंढरपुरातही अन्नाचे नमुने घेण्यात येत आहेत. भेसळयुक्त अन्न आढळल्यास तो साठा नष्ट करण्यात येणार आहे. भेसळयुक्त अन्न आढळल्यास, संशय आल्यास नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन जेटीथोर यांनी केले.

…अन्यथा गुन्हे दाखल करणार

पंढरपूरच्या पालखी स्थळ, मठामध्ये अन्नपदार्थ वाटप करण्यात येतात. शिळे अन्न असणार नाही याची दक्षता घ्यावी. शिळे अन्न आढळून आल्यास कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. भेसळ अन्न, पेढे, तेल आढळल्यास जागेवरच नष्ट करण्यात येणार असल्याचे जेटीथोर यांनी सांगितले.

पंढरपुरात विविध प्रकारची मिठाई, भगर, तेल, फळांचे नमुने घेण्यास सुरू झाले आहे. वारीत वारकर्‍यांना चांगल्या दर्जाचे अन्न मिळणार यासाठी अन्न व औषध प्रशासन काम करीत आहे. अन्न, मिठाई यात भेसळ होणार नाही यासाठी आमच्या टीमची करडी नजर असणार आहे.
– सुनील जेटीथोर, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT