आपले शरीर निरोगी राखण्यासाठी नेहमी पोषक आहार घ्यावा. आपल्या शरीराला पोषक अन्नपदार्थांची कमतरता भासल्यास आरोग्यात बिघाड होण्याची दाट शक्यता असते. योग्य प्रमाणात प्रोटिन आणि कॅलरीज मिळाल्यास अशा प्रकारचा त्रास होणार नाही. आता डाएटींगचे फॅड वाढत चालल्यामुळे बाजारात कमी कॅलरीज आणि शुगर फ्री खाद्यपदार्थांनी गर्दी केली आहे. त्यापैकी काही खाद्यपदार्थ आरोग्यवर्धक आहेत; पण काही पदार्थांमध्ये जीवनसत्त्वांची कमतरता आढळून येते. (Health Tips)
भारतीय लोकांमध्ये पॅक किंवा डबाबंद जेवण करण्याची पद्धत नाही. त्यांना गरम गरम आणि ताजे खाणे आवडते. गरम खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे आपली पचनक्रिया सुरळीत होण्यास फायदा होतो. ते शरीराला पोषकही असते; पण आजच्या धावपळीच्या जगात गरम गरम खायला कुणालाही सवड नाही. शिवाय एका जागी बसून खाणेही शक्य होत नाही. बहुतेक लोक फास्ट फूड खाऊन पोट भरतात. त्यामुळे पोटाचे आजार जडतात आणि त्यानंतर व्यायाम, योग अशा प्रकारचे पर्याय अवलंबावे लागतात. यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे पोटभर खाऊन दिवसभर काम केल्यास कोणत्याही प्रकारचा रोग जडत नाही.
व्यायाम आवश्यक आहेच; पण त्याबरोबरच खाण्याच्या निरोगी सवयीही सर्वात आवश्यक आहेत. बाजारातील विकतचे खाद्यपदार्थ शक्यतो खरेदी करू नयेत. ज्या पदार्थांच्या पॅकवर त्यातील घटक पदार्थांची माहिती, नावे योग्य प्रकारे दर्शवले नसतील, तर असे पदार्थ खरेदी करू नये. कितीही खा, काही होणार नाही, अशी जाहिरात असलेले पदार्थ शक्यतो खायचे टाळा. पदार्थ प्रमाणित सीलबंद नसल्यास विकत घेऊ नये. खाद्यपदार्थाची रेसिपी दिली नसल्यास तो पदार्थ विकत घेऊ नका. (Health Tips)