Latest

Prabhakar Mande Passed Away : लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक पद्मश्री प्रभाकर मांडे यांचे निधन

backup backup

नगर; पुढारी वृत्तसेवा : लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक पद्मश्री प्रभाकर भानुदास मांडे (वय 90) यांचे गुरुवारी (दि. 21) रात्री येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्याच्या पश्‍चात दोन मुले, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. मांडे यांच्या पार्थिवावर नगर येथेच शुक्रवारी (दि. २२ )सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संशोधक, साहित्यिक डॉ. प्रभाकर मांडे यांना याच वर्षी म्हणजे जानेवारी 2023 मध्ये भारत सरकारने 'पद्मश्री'ने सन्मानित केले होते. मांडे यांचा जन्म सावखेडा (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे 1933 मध्ये झाला. हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. 1955पासून विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांत त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून ते 1993 मध्ये सेवानिवृत्त झाले.

'कन्नड तालुक्यातील लोकसाहित्याचा चिकित्सक अभ्यास' या विषयावर त्यांनी मिळविलेल्या पीएच.डी. पदवीवर 'कलगीतुर्‍याची आध्यात्मिक शाहिरी' हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. मांडे गेल्या सहा दशकांपासून अध्यापन आणि संशोधनात सक्रिय होते. लोककला, लोकजीवन या विषयावर त्यांनी सात प्रकारचे संशोधन केले. संशोधनाला व्यापक रूप देण्यासाठी त्यांनी 'लोकसाहित्य परिषद' स्थापन केली. 'लोकसाहित्याचे स्वरूप', 'लोकरंगभूमी : परंपरा, स्वरूप आणि भवितव्य', 'एक होता राजा' (लोककथा), 'लोकरंगभूमी', 'लोकसाहित्याचे अंत:प्रवाह', 'गावगाड्याबाहेर', 'लोकनायकांची परंपरा', 'लोकरंगधारा', 'लोकपरंपरेतील खेळ', 'मांग आणि त्यांचे मागते', 'लोकपरंपरेतील शहाणपण', 'उपेक्षित पर्व', 'आदिवासी मूलत: हिंदूच', 'बिल्वदल', 'दलित साहित्याचे निराळेपण' आदी 51 ग्रंथ-पुस्तके मांडे यांच्या संशोधनातून साकारली. 2007 मधील मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. देश-विदेशातील अनेक चर्चासत्रांमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला. त्यांचा शेवटचा ग्रंथ वाल्मिक समाजाविषयी होता. अजूनही हा समाज उपेक्षितच आहे, अशी खंत त्यांनी पद्मश्री किताब मिळाल्यानंतर व्यक्त केली होती. अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT