Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 | हातकणंगले : ‘मविआ’च्या भूमिकेकडे लक्ष

Arun Patil

अनेक आव्हाने परतविणार्‍या तसेच प्रसंगी प्रतिकूल परिस्थितीत ती आव्हाने स्वीकारून त्यावर मात करणार्‍या हातकणंगले मतदार संघाची साथ यंदा कोणाला, याचीच चर्चा आहे. हातकणंगले हा मतदारसंघ कोल्हापूरच्या राजघराण्याचा लोकसभेत प्रवेश करणारा मतदारसंघ आहे. त्याचबरोबर चळवळीतील सर्वसामान्य कार्यकर्त्याला साथ देणारा म्हणूनही या मतदार संघाची ओळख आहे. यंदा इर्ष्येच्या लढतीत बाजी कोणाची, याकडे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीची भूमिका निश्चित झाल्यानंतर चुरस तीव्र होणार आहे. (Lok Sabha Election 2024)

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाने कायमच आपले वेगळेपण जपले आहे. कोल्हापूरच्या छत्रपती महाराणी विजयमाला साहेब यांना लोकसभेत विजय मिळवून देणारा हा मतदारसंघ आहे. पहिल्याच निवडणुकीत के. एल. मोरे यांनी बाजी मारली. देशभर जनता दलाचे वातावरण असताना 1977 ला काँग्रेसचे बाळासाहेब माने यांनी विजयी मिळविला. हा मतदारसंघ त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवला. 1996 व 98 साली काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे व 1999 व 2004 मध्ये राष्ट्रवादीच्या निवेदिता माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी 2009 व 2014 मध्ये, तर 2019 मध्ये शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी विजय मिळविला. सध्या ते शिंदे शिवसेनेत असून, त्यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)

धैर्यशील माने यांना पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी आमची उमेदवारी निश्चित होती. त्यामुळे आपल्याला उमेदवारीबद्दल कसलाच संभ्रम नव्हता, असे माने यांनी वारंवार स्पष्ट केले. मात्र, त्यांची उमेदवारी जाहीर होईपर्यंत अनेक उमेदवारांची नावे महायुतीचे उमेदवार म्हणून चर्चेत राहिली. अखेर माने यांनीच बाजी मारली. (Lok Sabha Election 2024)

उमेदवारी मिळाली, आता खरे आव्हान पुढेच आहे. यापूर्वी सलग सहा निवडणुकीत कल्लाप्पाण्णा आवाडे दोन वेळा, निवेदिता माने दोन वेळा तर राजू शेट्टी यांनी दोन वेळा हा मतदारसंघ आपल्याकडे राखला आहे. या तिघांचीही हॅट्ट्रिक चुकली. मात्र, सलग दोन निवडणुका त्यांनी जिंकल्या हे पाहता धैर्यशील माने यांना सलग दुसरी निवडणूक जिंकण्याचे आव्हान असेल.

राजू शेट्टी यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत. आपल्याला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल की नाही, याचा विचार न करता त्यांनी प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे माने आणि शेट्टी हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर आहेतच. त्याशिवाय या मतदार संघाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. याच मतदार संघाचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे नातू व भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांनी बंडाचा झेंडा फडकविण्याचे ठरविले आहे. राहुल हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. गेल्यावेळी वंचितचे अस्लम सय्यद यांनी 1 लाख 23 हजार 151 मते घेऊन शेट्टींची हॅट्ट्रिक रोखली होती. आता शेट्टी वंचित आघाडीकडून पाठिंब्याच्या अपेक्षेत आहेत. त्यांना जरांगे यांचाही पाठिंबा हवा आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांच्या भूमिकाही येथे महत्त्वाच्या ठरणार आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेकडे (ठाकरे) हा मतदारसंघ आहे. राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीच्या पाठिंब्याची अपेक्षा होती. मात्र, त्यांना पाठिंबा देण्यावरून महाविकास आघाडीत दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा शेट्टी यांना आघाडीत न येता पाठिंबा देण्यास विरोध आहे, तर महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांना विधानसभा निवडणुकीतील अ‍ॅडजेस्टमेंट म्हणून शेट्टी यांना पाठिंबा द्यावा असे वाटते. शिवसेनेने माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व सत्यजित पाटील-सरुडकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयारीत राहण्याचे आवाहन केले आहे. सहापैकी तीन विधानसभा मतदार संघाकडे महाविकास आघाडीकडे, तर तीन महायुतीकडे आहेत. स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवर येथील विजय अवलंबून असेल. महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट होईल, तेव्हा या मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होईल.

2019 चे मतदान

धैर्यशील माने (विजयी – शिवसेना)
5 लाख 85 हजार 776
राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
4 लाख 89 हजार 737
अस्लम सय्यद ( वंचित बहुजन आघाडी)
1 लाख 23 हजार 419

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT