वाडा (पुणे), पुढारी वृत्तसेवा: वसंत ऋतूची चाहूल लागताच निसर्ग आपला चमत्कार दाखविण्यास सुरुवात करतो. यामध्ये वनराई निरनिराळ्या फुले आणि फळांनी मोहून निघते. असेच चित्र खेड तालुक्याच्या पश्चिम भागात बघायला मिळत आहे. खेड तालुक्यातील पश्चिम भागाला मोठ्या प्रमाणावर डोंगररांगा असून, त्यामध्ये अनेक औषधी वनस्पती, निरनिराळी रानफुले, रानफळे बहरली आहेत.
सह्याद्रीच्या डोंगररांगा आता पिवळा शालू पांघरून बसलेल्या दिसत असून, त्यावर विविध रंगांच्या फुलांची उधळण निसर्गाने केली आहे. हे विलोभनीय दृश खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पाहायला मिळत आहे. डोंगररांगात सध्या चोहीकडे मोठ्या प्रमाणात पळस बहरला आहे. लाल व केशरी रंगांच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
20-25 फूट उंच असणार्या पळसाला संस्कृतमध्ये पलाश म्हणतात. याचा अर्थ फुलांनी डवरलेले झाड, असा होतो. पळसाची पानेही फार उपयोगी आहेत. पूर्वी या पानांपासूनच मोठ्या पंगतीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पत्रावळ्या बनविल्या जात. रस्त्याच्या बाजूला लावलेला बहावा पिवळ्या धमक झुंबरांनी सजलेला दिसतो. या बहाव्याचे ते सुंदर सोनेरी पुष्पवैभव न्याहाळताना अवर्णनीय आनंद लाभतो. अशी अनेक प्रकारची फुले, करवंदाची फुले, बहावाची फुले, पळस फुले, चाफा, टनटनीची फुले, पांगारा या निरनिराळ्या फुलांनी मन मोहून टाकले आहे.