Latest

फेसबुकवरची ओळख पडली महागात, अडीच लाख उकळून खुनाची धमकी देणार्‍या महिलेवर गुन्हा

अमृता चौगुले

मंचर, पुढारी वृत्तसेवा: फेसबुकवर ओळख झालेल्या विवाहित महिलेने विवाहित व्यक्तीची फसवणूक करीत त्याच्या घरातील साहित्य चोरून नेले. तसेच, 'तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून तुझा गेम करेन, तुला गाडीने उडवेन,' अशी धमकी देत त्याच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी एकूण अडीच लाख रुपये घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी रूपाली गोरख रासकर (रा. शिवसहारा सोसायटी, ता. पारनेर, सध्या रा. मंचर) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश नारायण हुले (रा. नारोडी, ता. आंबेगाव) यांनी याबाबत मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हुले यांची जानेवारी 2022 मध्ये रूपाली रासकरबरोबर फेसबुकमुळे ओळख झाली. त्यानंतर ते व्हॉट्सअ‍ॅप, फोनवर वारंवार बोलत होते. काही दिवसांनी ते नारोडी, पारनेर, आळेफाटा, भीमाशंकर या ठिकाणी भेटले होते. हुले यांनी सदर महिलेस तिच्या कुटुंबाबाबत विचारले असता तिने तिचे लग्न झाले असून, तिने घटस्फोट घेतल्याचे सांगितले.

तसेच एकटीच माहेरी बाबुर्डी (ता. पारनेर) येथे राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर रूपालीने हुले यांना, माहेरी वारंवार भांडण होत असल्याने मंचरमध्ये भाड्याने घर घेऊन राहू, असे म्हणाली. हुले व रूपाली मार्च 2022 मध्ये मंचरला भाड्याने राहू लागले. रूपालीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून हुलेंकडून वेळोवेळी अडीच लाख रुपये घेतले. काही दिवसांनी हुले यांना रूपालीला दोन मुले असल्याचे समजले. याबाबत त्यांनी तिला विचारले असता तिने मुले भावाची असल्याचे सांगितले. हुले यांना घरात रूपालीचे रेशन कार्ड मिळाले. त्यात तिला दोन मुले तिची असल्याचे समजले. याबाबत हुले यांनी विचारणा करून दिलेले पैसै परत मागितले. त्यावर रूपालीने मुले असल्याबाबतची गोष्ट कोणालाही सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली.

हुले यांनी रूपालीबाबत चौकशी केली असता त्यांना, मोराची चिंचोली (ता. शिरूर) येथील एका इसमाबरोबर तिचे लग्न झाल्यानंतर तिने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली. तसेच, तिच्यावर पारनेर येथे गाडीने उडविल्याबाबत जिवे मारण्याचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर रूपालीने हुले यांना लागेल तेव्हा पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची तसेच गाडीने उडवून देण्याची धमकी दिली. जुलैमध्ये हुले कामानिमित्त बाहेर गेले असता रूपालीने घरातील टीव्ही, मोबाईल व इतर साहित्य चोरी करून नेले, असे हुले यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT