संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: मांत्रिकाच्या सांगण्यावरुन मागासवर्गीय समाजातील महिलेचे केस मागणार्या दोघांवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा व अंधश्रद्धा समूळ उच्चाटण अधिनियमासह अॅट्रोसिटी दोघांवर संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावच्या शिवातरात शेतात गायी चारीत असताना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास दोन इसम त्याच गावातील एका मागासवर्गीय समा जाच्या महिलेजवळ आले आणि त्यातील एकाने 'माझी बहीण आजारी आहे, एका मंत्रिकाने मला मागासवर्गीय समाजातील महिलेचे केस आणून देण्यास सांगितले आहे.तुम्ही मला तुमचे केस देता का? असे त्या महिलेस एकाने विचारले असता 'मी केस देणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे ते दोघेही तिथून निघून गेले.त्यानंतर त्या महिलेने घडलेला सर्व प्रकार आपल्या मुलाला सांगितला.त्यानंतर त्यातील एकाची आणि त्या महिलेच्या मुलाची ओळख होती. त्याने मोबाईलवर संपर्क करत, त्या दोघांना कुठे आहे? अशी विचारणा केली त्यावर तो म्हणाला मला केस हवे आहे त्यावर तुम्ही या, मी तुम्हाला केस देतो असे सांगून त्यादोघांना त्या महिलेच्या मुलाने घरी बोलावून घेतले.
दरम्यानच्या त्या महिलेच्या मुलाने गावातील प्रतिष्ठीतांसह सरपंच व पोलिस पाटील यांना फोन करुन घराजवळ बोलावून घेतले. दोघेही तेथे आले. त्यांनी पुन्हा केसांची मागणी केली. यानंतर या महिलेने तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संतोष विठोबा निठवेरा (रा. डिग्रस) आणि भाऊसाहेब रामा कुदनर (रा.शिंदोडी) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.