रावणगाव, पुढारी वृत्तसेवा: खडकी (ता. दौंड) येथील २३ वर्षीय तरुणी पुण्यात शिक्षणासाठी असताना लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने लैंगिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली.
पुण्यातील कर्वे रोड हिंगणे परिसरात शिक्षणासाठी खडकी येथून गेलेल्या तरुणीशी ती अल्पवयीन असल्यापासून जून २०१४ ते १४ जुलै २०२२ दरम्यान अमोल ऊर्फ शरद अर्जुन जाधव (सध्या रा. कर्वे रोड, हिंगणे, पुणे; मूळ गाव अकोळनेर, जि. अहमदनगर) या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने लैंगिक संबंध ठेवले. पीडित तरुणीला परीक्षेच्या कालावधीत पेपरचे प्रश्न देऊन खूप मदत केल्याने माझ्याबरोबर प्रेम संबंध ठेव, अशी मागणी करून तिच्या इच्छेविरुद्ध आरोपीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच लग्नाचे वय पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर लग्न करीन, असे आश्वासन पीडित तरुणीला देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले. संबंध न ठेवल्यास दमदाटी व काढलेले फोटो, शूटिंग व्हायरल करण्याची धमकी दिली.
दरम्यान, लग्न करण्याची मागणी पीडित तरुणीने वारंवार केल्यानंतर अमोल जाधव याने २९ ऑक्टोबर २०१८ रोजी आळंदी येथे कृष्णा मंगल कार्यालयात त्याची बहीण छाया बाळू पवार, तिचा पती बाळू पवार यांच्या समक्ष लग्न लावले. त्यानंतर पीडित तरुणीला होस्टेलवर आणून सोडले. २०२० मध्ये कोविडकाळात पीडित तरुणीला अमोलने मूळ गावी आणून सोडले. त्यानंतर आरोपी अमोलने पीडित तरुणीला फोन करून 'तू माझ्याबरोबर लग्न केले असून, माझ्या घरी नांदायला ये; अन्यथा तुमच्या गावात येऊन तुझी व वडिलांची बदनामी करेन,' अशी धमकी दिली.
अमोल ऊर्फ शरद अर्जुन जाधव याने फोनवर वारंवार दमदाटी, शिवीगाळ केल्याने पीडित तरुणीने दौंड पोलिसात फिर्याद दिली. यावरून दौंड पोलिसांनी अमोल पवार याच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे