महेंद्र कांबळे/अशोक मोराळे
पुणे : खेळण्या-बागडण्याच्या वयातील मुला-मुलींना लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या घटनांवरून समोर आले आहे. चांगल्या-वाईट गोष्टींची समजही नसलेल्या चिमुरड्यांना या वेदना सहन कराव्या लागत आहेत. गेल्या सहा वर्षांत (2017-22) शहरात एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 1 हजार 679 बालके लैंगिक अत्याचाराची शिकार झाली आहेत. या घटना पाहिल्या, तर प्रामुख्याने त्यांच्या घरातील, नात्यातील तसेच जवळच्या ओळखीच्या व्यक्तींकडून लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसते.
त्यामध्ये घरातील व्यक्ती, काका, वडील, भाऊ, आजोबा, शिक्षक, स्कूल बसचालक, शेजारी, वडिलांचा मित्र, मानलेले नातेवाईक त्यांच्याकडून ही घृणास्पद कृत्ये झाल्याचे दिसून येते. चालू वर्षात दहा महिन्यांत बाललैंगिक अत्याचाराच्या 237 घटना घडल्या आहेत. घडलेल्या घटनांमध्ये तब्बल 90 टक्क्यांहून अधिक घटना ह्या नातेवाईक, ओळखीच्या व्यक्तींकडून झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कायदे कडक करण्यात आले, तरी अत्याचारांच्या घटना थांबताना दिसत नाही. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी आणखी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. बाललैंगिक अत्याचाराच्या घटना कशा रोखायच्या, हे पोलिसांसमोर आव्हान आहे.
पालकांनो, मुलांना 'बॅड टच, गुड टच' शिकवाच
बाललैंगिक अत्याचाराच्या बहुतांश घटनांना शाळा आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून केलेल्या समुपदेशन तसेच 'बॅड टच आणि गुड टच'च्या (वाईट आणि चांगला स्पर्श) माध्यमातून वाचा फुटली आहे. दोन दिवसांपूर्वी विश्रांतवाडी परिसरातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली. शाळेतील बॅड टच आणि गुड टचच्या माध्यमातूनच या घटनेला वाचा फुटली. त्यामुळे पालकांनो तुमच्या मुलाला 'गुड टच आणि बॅड टच' काय असतो, याची माहिती द्या. अनेकदा लैंगिक अत्याचार होऊन देखील बालकांना हे सांगता येत नाही की, नेमके आपल्याबरोबर काय झाले आहे. तसेच भीतीपोटी देखील बालके आपल्याला याची माहिती देत नाहीत. त्यामुळे ठराविक वयात आणि ठराविक कालावधीत बालकांना हे प्रशिक्षण गरजेचेच आहे.
जनजागृती व्हायला हवी
बाललैंगिक अत्याचार खटल्यातील सरकारी वकील लीना पाठक सांगतात की, लहानपणापासून बाललैंगिक अत्याचारांबद्दल शाळांनीही मुलांमध्ये जाकरुकता निर्माण केली पाहिजे. अशा प्रकारामध्ये घरातील किंवा जवळची व्यक्ती असल्यास प्रकरण दाबण्याकडे कल असतो. परंतु, अशा अत्याचारामुळे मुलांच्या भविष्याचे काय? याही प्रश्नाचे उत्तर कुठेतरी शोधण्याची गरज आहे. अत्याचार करणारी व्यक्ती घरातील असेल, तरीही प्रकरण लपवून न ठेवता तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तत्परतेने पुढे आले पाहिजे. याविषयी प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमांद्वारे जनजागृती होत असल्याचे दिसत असून, खटले दाखल होण्याचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जनजागृतीनंतर जेव्हा गुन्हे दाखल होतात, जेव्हा खटला चालविण्याची वेळ येते तेव्हा नातेवाईक आरोपी असेल, तर बर्याच वेळेला पालकांकडून गुन्ह्यात खटला मागे घेण्यासाठी प्रयत्न होतो. त्यामुळे मुलांचे भवितव्य अंधारात राहते. त्यांना न्याय मिळत नाही.
तक्रारीसाठी पुढे आले पाहिजे
नातेवाईक असेल, तरीही तक्रारीसाठी पुढे आले पाहिजे जनजागृतीमुळे बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी नागरिक पुढे येण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु, अशा घटनांमध्ये बदनामी होईल, हा दृष्टिकोन मनात ठेवून अनेक जण फिर्याद देण्यासाठी पुढे येत नाहीत. परंतु, अशा प्रकरणांत पीडित मुलीचे नाव समोर येत नाही. त्यामुळे अशा अत्याचाराच्या घटनांमध्ये नातेवाईक असेल, तरीही तक्रारीसाठी पुढे आले पाहिजे
बाललैंगिक अत्याचाराच्या घटना टाळण्यासाठी मुलांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. पालकांनी खुल्या मनाने बोलले पाहिजे. बाललैंगिक अत्याचार म्हणजे काय? त्याबाबत कुणाची मदत घेतली पाहिजे? मोठ्यांनी सांगितलेल्या कोणत्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत? कोणत्या गोष्टींना विरोध केला पाहिजे? याबाबत संवाद हवा. अत्याचार करणारी व्यक्ती कोणीही असो, तिच्याविरोधात आवाज उठविण्यासाठी पुढे आले पाहिजे. मोबाईलच्या वापरावरही पालकांचे लक्ष असले पाहिजे. – अॅड. यशपाल पुरोहित
पाहा आकडे काय सांगतात
वर्ष गुन्हे
2017 338
2018 313
2019 271
2020 229
2021 291
2022 237