न्यूयॉर्क : आपण ज्या नावेतून प्रवास करतो तिच्या बुडण्याची वाट पाहणारे लोक मूर्खच म्हणावे लागतील. अशाच वृत्तीचे लोक सातत्याने जगाच्या अंताची भाषा करीत असतात. कधी माया संस्कृतीमधील कॅलेंडरच्या सहाय्याने तर कधी कुठल्या धर्मगुरूच्या, भविष्यवेत्त्याच्या भाकिताचा आधार घेऊन अमक्या दिवशी जगाचा अंत होणार अशा अफवा पसरवल्या जात असतात. आता हे काम 'भविष्यातून आलेल्या' एका माणसाने केला आहे. आपण इसवी सन 2671 मधून आलेलो आहे असा दावा हा माणूस करतो. त्याच्या म्हणण्यानुसार आणखी पंधरा वर्षांनी पृथ्वीवासीयांचे एलियन्स म्हणजेच परग्रहवासीयांशी युद्ध होऊन जगाचा अंत होईल! अर्थात पंधरा वर्षांनी जगाचा अंत झाला तर सन 2671 मध्ये या माणसाचा जन्म कसा होईल हे तो सांगत नाही!
सोशल मीडियात याबाबतचा एक व्हिडीओ आला आहे. त्यामधील व्यक्तीचा दावा आहे की तो 'टाईम ट्रॅव्हलर' आहे. त्याच्या म्हणण्यानुसार तो भविष्यातील दुनियेतून आलेला आहे आणि त्यामुळेच भविष्यात काय काय घडणार हे त्याला माहिती आहे. त्याच्या म्हणण्यानुसार पंधरा वर्षांपर्यंत एलियन्स पृथ्वीवर नजर ठेवतील आणि त्यानंतर मानवाशी युद्ध सुरू करतील. याच युद्धामुळे पंधरा वर्षांनंतर जगाचा अंत होईल. आपण भविष्यातील 2858 या वर्षापर्यंतचा प्रवास केला असल्याचाही त्याचा दावा आहे!
भविष्यात माणसाला पृथ्वीसारखाच अन्य एखादा ग्रह शोधावा लागेल असेही त्याचे म्हणणे आहे. त्याने चालू वर्षाबद्दल जी भाकिते केली आहेत त्यापैकी ही काही भाकिते : 23 मार्च पृथ्वीला वाचवण्यासाठी एलियन्सकडून 8 हजार लोकांची निवड केली जाईल. 15 मे : सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 750 फूट उंचीची त्सुनामी येईल व दोन लाखांपेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडतील. 18 जून : आकाशातून सात लोक एकाच वेळी खाली पडतील. 18 ऑगस्ट : त्वचेच्या कर्करोगावर प्रभावी उपचार सापडेल. 3 डिसेंबर अनेक आजारांना बरे करू शकणारे स्फटिक सापडेल. 29 डिसेंबर स्टेम सेल्स म्हणजेच मूळपेशींच्या माध्यमातून अनेक अवयवांची निर्मिती होईल.