Latest

FIFA World Cup : कतारमध्ये ‘सेक्स’ बाबतच्या कायद्यात मोठा बदल!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : fifa world cup qatar : 20 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या फुटबॉल वर्ल्ड कपपूर्वी कतार सरकारने मोठी घोषणा केली आहे. तेथील सरकारने म्हटले आहे की, वर्ल्ड कपदरम्यान महिलांना वैद्यकीय उपचारादरम्यान त्यांच्या वैवाहिक स्थितीबद्दल विचारले जाणार नाही. कतारमध्ये विवाहबाह्य लैंगिक संबंध हा गुन्हा मानला जातो. 'कोणत्याही महिलेला ती विवाहित आहे की नाही हे विचारले जाणार नाही,' असे आयोजन समितीचे आरोग्य सेवा प्रवक्ते युसेफ अल-मसलामणि यांनी सांगितले.

कडक कायदे

कतारमध्ये विवाहाबाह्य लैंगिक संबंध ठेवल्यास सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे. अनेक वर्षांपासून अशी शिक्षा कोणालाच झाली नसल्याचे तेथील अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी कडक कायद्यामुळे सातत्याने आक्षेप घेण्यात येत होते. याशिवाय काही दूतावासांनी त्यांच्या देशातील गर्भवती महिलांना कतारमध्ये वैद्यकीय उपचार हवे असल्यास लग्नाचा पुरावा द्यावा, असा सल्ला दिला होता. हे सर्व पाहता तेथील सरकारने कायद्यातील बदलाची घोषणा केली आहे.

फक्त मेडिकल हिस्ट्री विचारली जाईल

वर्ल्ड कप (fifa world cup qatar) स्पर्धेदरम्यान महिला प्रेक्षकांच्या उपचाराबाबत अनेक गटांनी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे महिलांवरील उपचारांबद्दल मसलामणि यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 'फिफा वर्ल्ड कप दरम्यान रुग्णालयात उपचार घेताना कुणालाही त्याचे लिंग, राष्ट्रीयत्व किंवा धर्म विचारले जाणार नाही. लोकांना फक्त त्यांच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल विचारले जाईल. यानंतर उपचारांची गरज भासल्यास ते केले जातील,' असे त्यांनी स्पष्ट केले.

ऑस्ट्रेलियन महिलांच्या एका गटाने दोन वर्षांपूर्वी घडलेल्या एका समस्येबद्दल कतार एअरवेज आणि देशाच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे जाहीर केले होते. यानंतर कतारला याप्रकरणी माफी मागावी लागली होती. तसेच विमानतळावरील एका कर्मचाऱ्यालाही निलंबित करण्यात आले होते. खरं तर, ऑक्टोबर 2020 मध्ये जेव्हा विमानतळावर एक बेवारस नवजात अर्भक सापडले होते त्यानंतर त्या ऑस्ट्रेलियन महिलांना दोहा विमानतळावर महिलांशी संबंधित अनेक वैद्यकीय चाचण्या कराव्या लागल्या होत्या.

तिकीट असलेल्या प्रेक्षकांशिवाय इतरांनाही कतारमध्ये प्रवेश

कतारने केवळ वर्ल्ड कप (fifa world cup qatar) सामन्याचे तिकीट असलेल्या प्रेक्षकांना देशात प्रवेश देण्याबाबत नियम केला होता. मात्र या नियमात आता बदल करण्यात आला आहे. याआधी, 1 नोव्हेंबरपासून, वर्ल्ड कप सामन्याचे तिकिटे असलेल्या चाहत्यांसह फक्त तीन पाहुण्यांना देशात प्रवेश करण्याची परवानगी होती, परंतु आता हा नियम 2 डिसेंबरपर्यंत म्हणजे स्पर्धेचा गट स्टेज संपेपर्यंत शिथिल केला असल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT