छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे श्रद्धास्थान आहेत. शिवरायांची जयंती नेमकी कधी साजरी करायची? हा वाद वर्षानुवर्षे सुरूच आहे. अगदी यावरून विधिमंडळातदेखील वादविवाद रंगले आहेत. अशाच एका वादात तत्कालीन विधानमंडळाचे सदस्य प्रा. रामकृष्ण मोरे यांनी 19 फेब्रुवारी 1630 हा शिवाजी महाराजांचा जन्मदिवस असल्याचे सरकारच्या वतीने अधिकृतपणे निदर्शनास आणून मान्य केले आणि तेव्हापासून सरकारच्या वतीने 19 फेब्रुवारी हा दिवस शिवजयंती म्हणून साजरा केला जाऊ लागला. शिवसेनेने मात्र मराठी बाणा दाखवत तिथीनुसार जयंती साजरी करण्याची प्रथा सुरू ठेवली.
भाजपसोबत युतीचे सरकार असतानाही शिवसेना तिथीनुसार जयंती साजरी करीत असे. अर्थात, सरकारी शिवजयंतीदेखील उत्साहाने साजरी होत होती. आता आघाडी सरकारचे नेतृत्व करणार्या शिवसेनेला भाजपने या मुद्द्यावरूनदेखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई विमानतळावर जाऊन शिवछत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन केले. मात्र, एरव्ही महापुरुषांच्या स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमा विधानभवनाच्या प्रवेशद्वारासमोर ठेवून त्यांना वंदन करण्याची प्रथा असताना महाराजांची प्रतिमा मात्र दिसली नाही. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याच मुद्द्यावर सभागृहात प्रश्न उपस्थित केला. 'राज्याचे मुख्यमंत्रीच आज शिवजयंती साजरी करत आहेत. मग सरकारला ती करायला अडचण काय?' असा सवाल मुनगंटीवारांनी केला. सुधीरभौ हे असे अचानक चिमटे घेण्यात पटाईत आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार अशा तिढ्यांना पुरून उरतात.
'राज्याचे मुख्यमंत्री तिथीप्रमाणे शिवजंयती साजरी करत असताना राज्याचे अधिकारी मात्र आम्ही 19 फेब्रुवारीला ती साजरी करतो म्हणतात. अशी द्विधा परिस्थिती चांगली नाही. काँग्रेसच्या एका नेत्यानेही तिथीनुसार शिवजयंती साजरी करा, असं सांगितले आहे,' असंही मुनगंटीवार यांनी निदर्शनास आणलं. सुधीरभौंचा हा पेच सोडवायला उपमुख्यमंत्री अजित पवार उभे राहिले. भाजप आणि शिवसेनेचे सरकार असताना कधीही सरकारी शिवजयंती तिथीनुसार साजरी झाली नव्हती, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. 19 फेब्रुवारी हा शिवरायांचा जन्मदिवस असून, त्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री शिवनेरीवर जाऊन अभिवादन करून जयंती साजरी करतात. ही परंपरा आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवली आहे, असे पवार म्हणाले.
अर्थात, शिवाजी महाराज हे सर्वांचेच दैवत असून, त्यांचे स्मरण करण्यासाठी कुठलाही ठराविक दिवस मानण्याची गरज नाही. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, सप, भाजप कोणत्याही पक्षाच्या सदस्याला तिथीप्रमाणे जयंती साजरी कराची असेल, तर ते महाराजांच्या पुतळ्याला जाऊन अभिवादन करू शकतात. विधानभवनाच्या आवारात शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. छोट्या फोटोपेक्षा तिथे जाऊन अभिवादन करा, उन्हाचा त्रास होतो काय तुम्हाला? कारण नसताना वेगळी चर्चा करू नका, असे पवारांनी खडसावले! हे इतके झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात आले आणि ते येण्याआधी विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवली गेली. स्वतः मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी जोडीने शिवप्रतिमेला वंदन केले!
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आजपासून सुरू झाला; मात्र विधानसभेच्या अध्यक्षपदाचा तिढाही अजून कायम आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांची याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर ते आता सुप्रीम कोर्टात गेले आहेत. अध्यक्षपदाच्या तिढ्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्यमंत्र्यांशी आता काय भूमिका घ्यायची, याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात महाविकास आघाडीचे नेते पुन्हा एकदा राज्यपालांना भेटण्याची शक्यता आहे. मात्र, महाजन यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय येईपर्यंत राज्यपाल सरकारला दाद लागू देणार नाहीत, असे दिसते. राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्याआधी निधी वाटपाबाबत शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये असलेली तीव्र नाराजी मुख्यमंत्र्यांनी दूर केल्याचा दावा काँग्रेस आणि शिवसेनेचेही आमदार करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानाचा प्रारंभ करताना केलेले भाषण सध्या चर्चेत आहे.
भाजपवर त्यांनी अत्यंत कडवट शब्दांत टीका केली होती. पार सरसंघचालक मोहन भागवतदेखील त्यांच्या फटकार्यातून सुटले नाहीत. विधानसभेत मात्र अधिवेशन सुरू झाल्यापासून ते एकदाही बोलले नाहीत. पक्षाच्या पदाधिकार्यांसमोर बोलणारे मुख्यमंत्री विधिमंडळाच्या सभागृहात शेवटच्या आठवड्यात तरी बोलणार का, असा प्रश्न विरोधकच नव्हे, तर आघाडीच्याही आमदारांना पडला आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक धुमाकूळ घालत असताना मुख्यमंत्र्यांची एकाही शब्दाची प्रतिक्रिया यावर आलेली नाही. आता सभागृहात ते बोलले, तर याचेही उत्तर त्यांना द्यावे लागेल!