फीचर्स

मा. श्री. नरेंद्र मोदीजी : कर्तव्यधर्माचे पालक

मोहन कारंडे

डॉ. योगेश जाधव, समूह संपादक, दैनिक 'पुढारी'

आव्हानांना भिडणारी, जनतेच्या मनात विश्वास जागवणारी आणि कर्तव्याप्रती प्रखर निष्ठा असणारी व्यक्ती निर्विवादपणे समाजाचा नेता असते. ही गुणसंपदा असलेल्या दिग्गज नेत्यांची परंपरा भारताला लाभलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिग्गज परंपरेचे आजचे सर्वांत योग्य वारसदार आहेत. राजकारण आणि समाजकारणातील नरेंद्र मोदी नावाचा ब्रँड आज देश व्यापून आहे. परंपरागत राजकारणाला फाटा देत त्यांनी आपले राजकारण उभे केलेले आहे. त्यांचे राजकारण विकासाभिमुख आहे आणि त्यांचे राजकारण भविष्यवेधी आहे. त्यांना छोट्या स्तरावर, मर्यादित पातळीवर विचार करणे रुचत नाही. त्यामुळे त्यांच्या योजनांची झेप अफाट आहे आणि त्याचा परीघही कित्येक पट विस्तारलेला असतो. या देशातील सामान्य माणसाचा स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची 64 वर्षे बँकिंग व्यवस्थेशी संपर्कच नव्हता; मोदींनी 'जन धन बँक खाते' ही योजना राबवून 45 कोटी अतिसामान्य माणसांना बँकिंगशी जोडून घेतले. महिलांचे सक्षमीकरण करताना त्यांच्या मूलभूत यातना संपुष्टात आणण्यासाठी काय करता येईल, तर त्यांना चुलीच्या धुरातून मुक्त केले पाहिजे, ही भूमिका मोदींचीच. या महिलांना आठ कोटी एलपीजी गॅस कनेक्शन देत त्यांनी ते घडवून आणले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत 11 कोटी शौचालये बांधून महिलांच्या सन्मानाची बोलकी कृती मोदींकडूनच घडली. पाणी भरून आणण्यासाठी होणारा त्रास महिलांना होतो; त्या यातनांतून मुक्त करण्यासाठी 'हर घर नल' ही 'जल जीवन मिशन' योजना राबवीत कोट्यवधी घरांत नळाचे पाणी पोहचविण्याचा मान मोदींचाच आहे. मोदींना तंत्रज्ञानाचे वावडे नाही आणि मोदींना सांस्कृतिक वारशाविषयी अपार आस्था आहे. माणसे जेवढी तंत्रज्ञानाने जोडली जाऊ शकतात, तितकीच ती भावनिक बंध आणि सांस्कृतिक घटकांनी जोडली जातात, यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. जनतेशी नाळ आणि जनतेशी संवाद, त्यांच्याइतक्या ताकदीने कोणीही करू शकत नाही. कोरोनाच्या काळातून आपला देश बाहेर पडण्यामागे मोदींवर असणारा जनतेचा विश्वास आणि मोदींचा जनतेवर असणारा विश्वास, याचा सिंहाचा वाटा आहे. नवनव्या कल्पना मांडत त्या अमलात आणण्यासाठी प्रोत्साहित करीत राहणे, हा त्यांचा लोकविलक्षण गुण आहे. ते मुलांशी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमातून बोलतात, ते 'मन की बात'मधून देशातील कोट्यवधी लोकांशी महिन्यातून एकदा संवाद करतात. संवाद ही त्यांची ताकद आहे. आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यांमुळे भारताचे क्षितिज बदलते आहे. यामागची ऊर्जा प्रशासकीय अधिकार्‍यांकडून नव्हे, तर मोदींच्या नेतृत्वातून आलेली आहे. कर्तव्यधर्माशी इमान राखून त्याचे पालकत्व निभावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जन्मदिवसाच्या 'पुढारी समूहा'च्या वतीने अपार शुभेच्छा!

SCROLL FOR NEXT