फीचर्स

मकर संक्रांत : सूर्य संक्रमणाचे शुभपर्व 

स्वालिया न. शिकलगार

21/22 डिसेंबरपासून उत्तरायण सुरू होते. उत्तरायण म्हणजे सूर्याचे उत्तर दिशेकडे होणारे अयन. सूर्याचा उत्तरेकडे सुरू होणारा प्रवास. उत्तरायणात दिवस मोठे होतात. रात्र लहान होते. आर्यांचा पहिला वेद ऋग्वेद! या ऋग्वेदात उषा सूक्ते आहेत. उत्तरायणातील उगवत्या दिवसांची स्तुती करणारी ही सूक्ते आहेत. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे सूर्याचे उत्तरायण हे दक्षिणायनापेक्षा अधिक पवित्र मानले जाते. इच्छामरणी भीष्माचार्य दक्षिणायनात शरपंजरी पडले; परंतु त्यांनी उत्तरायण सुरू झाल्यावर प्राणत्याग केला, अशी महाभारतात कथा आहे.

महाभारतातील कथेनुसार संक्रांत हे पुत्रप्रदव्रत आहे. हा सण सलोख्याचा आणि परस्पर सद्भावना निर्माण करणारा आहे. उत्तरायणातील पौष, माघ हे महिने थंडीचे असतात. फाल्गुन पौर्णिमेनंतर थंडी ओसरते. मकर संक्रमण म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश! सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो, तो दिवस म्हणजेच मकर संक्रांतीचा सण!

ज्योतिषशास्त्रदृष्ट्या सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाला विशिष्ट महत्त्व आहे. मकर ही राशीचक्रातील दहावी रास. जगत्कुंडलीत मकर रास म्हणजे दशमस्थान. कुंडलीमध्ये दशम भावावरून कर्तृत्व संपन्नतेचा बोध होतो. स्वाभाविकच मकरेतील रवीचा प्रवेश ज्योतिषशास्त्रदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जातो.

मकर संक्रांतीच्या सणाला अशी विविध अंगांनी संपन्न पार्श्वभूमी लाभलेली आहे. हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो. तिळगूळ देऊन परस्परांचे मैत्र आणि स्नेहभाव वृद्धिंगत केला जातो. दोस्तीची वीण घट्ट केली जाते. असा हा स्नेहीजनांचा सण भारतीय सण परंपरेतील वैशिष्ट्यपूर्ण सण आहे. या सणावेळचे दिवस असतात थंडीचे. संक्रांतीनिमित्त दिल्या जाणार्‍या तिळगुळात उष्णधर्मीय गुण असतात. संक्रांतीआधीच्या दिवशी 'भोगी' असते. त्या दिवशी प्रामुख्याने बाजरीचे पदार्थ असतात. बाजरीही उष्ण आहे. नैसर्गिक वातावरणाला अनुसरून असलेल्या भारतीय सणांशी निसर्गानुकूल खाद्यपदार्थांची सांगड घालण्यात पूर्वसुरींनी मोठी कल्पकता दाखवली आहे. संक्रांतीच्या सणानिमित्त वाण देण्यासाठी भगिनीवर्गाची मोठीच लगबग असते. नवीन भांडी, वस्त्रे, अन्नपदार्थ, तिळपात्र असे पदार्थ वाण म्हणून मोठ्या उत्साहाने दिले जातात.

संपूर्ण भारतात ठिकठिकाणी संक्रांतीचा हा सण साजरा होतो. उत्तर भारतात प्रयाग आणि गंगासागर येथे संक्रांती पर्व स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. दक्षिणेत वेदारण्यम येथे समुद्रस्नानासाठी  भाविकांची मांदियाळी जमते. पौराणिक कथेनुसार  कुंभकोणम येथेही संक्रांत सणाला विशेष महत्त्व दिले जाते. उत्तरेत खिचडी आणि दक्षिणेत पायस म्हणजे खीर असे पदार्थ सणानिमित्त केले जातात. बंगालमध्ये संक्रांतीनिमित्त काकवीत तीळ घालून खास पदार्थ बनवला जातो. तामिळनाडूत पोंगल म्हणून संक्रांतीचा सण साजरा होतो. तीन दिवस हा सण साजरा केला जातो. संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी पोंगल म्हणतात. त्या दिवशी होळी पेटवली जाते. त्यात अनावश्यक गोष्टींचे दहन केले जाते. मुख्य दिवशी तांदूळ, गूळ, दूध यांचे पायस-खीर हे पक्वान्न केले जाते. तिसर्‍या दिवशी गोठ्यातील गुरांची पूजा होते. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. त्याच्यासाठी चांगले आयुष्य मागते. गुजरात आणि राजस्थानात संक्रांतीच्या सणावेळी लहान थोर पतंग उडवण्याचा आनंद लुटतात. पतंगोत्सव साजरा होतो. तो पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात.

पंजाब-हरियाणात हा सण लोहडी नावाने ओळखला जातो. हिवाळ्यातील हा थंड दिवस असतो. सायंकाळी शेकोटी पेटवली जाते. लहान मुले गाणे म्हणत घरोघरी जाऊन लाकडे आणि पैसे गोळा करतात. शेकोटीत तीळ, तांदूळ, उसाचे कांडे अशा वस्तू टाकल्या जातात. लोहडी देवीची पूजा केली जाते.

परदेशातही हा उत्साहाचा सण साजरा होतो. नेपाळमध्ये 'माधी' या नावाने, थायलंडमध्ये 'सोंग्कान', लाओसमध्ये 'पिमालाओ', म्यानमारमध्ये 'थिंगयान' अशा नावानी संक्रांत साजरी केली जाते. देशभरात आणि काही परदेशांतही मोठ्या आनंदाने साजरा होणारा हा संक्रांतीचा सण उत्तरायणाचे म्हणजेच दिवसेंदिवस मोठ्या होणार्‍या दिवसांचे स्वागत करणारा सण आहे. भारतीय कृषी संस्कृतीशी निगडित असा हा सण आहे. सुगडात नवे धान्य भरून ते ईश्वराला अर्पण करण्याच्या प्रथेतून कृषी संस्कृती जपणारा हा सण आहे. भारतीय जीवनात अविभाज्य भाग बनलेला हा सण शुभंकर आणि नवीन उपक्रमाला उत्तेजन देणारा सण आहे.

संक्रांत अशुभ नव्हे, शुभपर्व दायिनी!

मकर संक्रांतीचा असा हा मोठ्या आनंदाचा, उत्साहाचा, निसर्गाशी तादात्म्य साधणारा, मैत्री, स्नेहभाव दृढपणे जपणारा सण! हा सण अशुभ असल्याची अफवा काही जण पसरवतात; पण त्यामध्ये यत्किंचितही तथ्य नाही. धर्मशास्त्रात त्याला कोठेही, कसलाही आधार नाही. संक्रांत अशुभ तर नाहीच; पण ती शुभपर्वाला प्रारंभ करणारी आहे. अशा या शुभपर्वदायी संक्रांतीचा मुहूर्त साधून नूतन कार्यारंभ करता येईल. नव्या संकल्पाला हात घालता येईल. विविध वस्तू खरेदीलाही संक्रांतीचा सण शुभच म्हटला पाहिजे. 'संक्रांत' हा सण आहे. 'संक्रांत येणे' हा स्वतंत्र वाक्प्रचार आहे. 'संक्रांत येणे' या वाक्प्रचाराचा आणि 'संक्रांत' सणाचा परस्परांशी काडीमात्रही संबंध नाही. संक्रांतीचा सण हा पूर्णपणे शुभ आणि शुद्धच आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT