संग्रहित  
फीचर्स

देशातील काही प्रसिद्ध गणेशमंदिरे

स्वालिया न. शिकलगार

भारतीय संस्कृतीत श्रीगणेशाचे स्थान अनन्यसाधारण आहे. गणाधीशाचे स्मरण करूनच कोणत्याही कार्यास, विधीस शुभारंभ केला जातो. विघ्नहर्त्या, सुखकर्त्या आणि बुद्धीची देवता असलेल्या गणेशाची देशात आणि परदेशातही श्रद्धेने पूजा केली जाते. आपल्या देशात अनेक ठिकाणी गणेशाची प्राचीन व वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत. त्यापैकी काही मंदिरांची ही माहिती…

• कनिपकम विनायक : हे सुंदर मंदिर आंध—प्रदेशात तिरुपतीपासून 75 किलोमीटरवर आहे. देशातील सुंदर अशा प्राचीन गणेश मंदिरांमध्ये याचा समावेश होतो. येथील गणेशमूर्तीच्या कपाळावर पांढरा, पिवळा आणि लाल अशा तीन रंगांच्या नैसर्गिक छटा दिसतात. अकराव्या शतकात चोळ राजवटीत या मंदिराची उभारणी झाली. गणेश चतुर्थीला याठिकाणी मोठा उत्सव असतो.

• मधूर महागणपती : केरळमध्ये कासारगोड येथील मधुवाहिनी नदीच्या काठी हे दहाव्या शतकातील प्राचीन गणेश मंदिर आहे. कुम्बलाच्या मिपाडी राजाने हे मंदिर बांधले. याठिकाणी असलेली गणेशमूर्ती ही माती किंवा पाषाणाची नसून ती वेगवेगळ्या घटकांपासून बनलेली आहे. तेथील कुंडाचे पाणी औषधी असल्याचे मानले जाते. विशेषतः चर्मरोगांवर ते गुणकारी असल्याची मान्यता आहे.

रणथंबोर गणेश : देशातील अभयारण्यांमध्ये राजस्थानमधील रणथंबोर अभयारण्य अतिशय प्रसिद्ध आहे. या अभयारण्यातील जैवविविधतेचे लोकांना आकर्षण असतेच; पण भाविकांना तेथील गणेश मंदिराचेही आकर्षण आहे. याठिकाणी त्रिनेत्र गणेश विराजमान आहे. रणथंबोरच्या ऐतिहासिक आणि एक हजार वर्षे जुन्या किल्ल्यावर हे गणेश मंदिर आहे. दरवर्षी गणेश चतुर्थीला याठिकाणी उत्सव असतो. या उत्सवाच्या चार दिवसांच्या काळात मंदिराला दरवर्षी सुमारे दहा लाख भाविक भेट देतात!

गणेश टोक मंदिर : सिक्‍कीममध्ये गणेशाचे प्रसिद्ध मंदिर आहे याची अनेकांना कल्पना नसेल. राजधानी गंगटोकमध्ये हे मंदिर असून ते एका उंच टेकडीवर आहे. हे गंगटोकमधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. अनेक लोक आपले भाग्य उजळावे यासाठी येथील गणेशाला प्रार्थना करण्यासाठी येत असतात. तेथील निसर्गसौंदर्यही लोकांना आकर्षित करते.

उच्ची पिल्‍लायर कोईल मंदिर : तामिळनाडूतील या मंदिराला 'रॉकफोर्ट टेम्पल' म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर तामिळनाडूत तिरुचिरापल्‍ली शहरातील उंच अशा टेकडीवर आहे. रावणवधानंतर अयोध्येत आल्यावर भगवान श्रीरामांनी आपल्या पूजेतील श्रीरंगनाथाची मूर्ती विभिषणाला दिली होती, अशी मान्यता आहे. मात्र, येथील श्रीगणेशांमुळे ही मूर्ती लंकेत जाऊ शकली नाही, अशी आख्यायिका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT