फीचर्स

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : शिवसेनेची डरकाळी की अपरिहार्यता

अमृता चौगुले

कोल्हापूर; संतोष पाटील : जिल्ह्यातील राजकारणात दोन्ही काँग्रेसकडून शिवसेनेला गृहीत धरूनच वाटचाल सुरू असल्याची खदखद शिवसेनेत होती. तालुक्यातील राजकारण करताना भविष्यात दोन्ही काँग्रेसशी दोन हात करावे लागणार आहेत. या विचारातून शिवसेनेने जिल्हा बँकेच्या राजकारणात ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) सवतासुभा मांडला आहे. शिवसेनेची ही डरकाळी होती की, तडजोडीच्या राजकारणातील अपरिहार्यता होती, हे निकाल आणि त्यानंतरच्या वाटचालीनंतरच स्पष्ट होईल.

राज्यात महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी कोल्हापुरात आकाराला आली होती. मात्र, जिल्हा बँक निवडणुकीच्या ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) निमित्ताने यात मिठाचा खडा पडतो की काय, अशी चर्चा आहे. जिल्हा बँकेत काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपची साथ केली; ही ताजी घडामोड असली, तरी शिवसेनेच्या नाराजीमागे अनेक पैलू आहेत. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत शिवसेनेने झगडून अधिकच्या जागा पदरात पाडून घेतल्या. 'गोकुळ'मध्ये खा. संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांचा आश्चर्यकारकरीत्या पराभव झाला. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची शासननियुक्त संचालकपदी निवड होऊनही संघातील एंट्री रोखली. जिल्हा परिषद अध्यक्षपदी राहुल पाटील यांच्या निवडीत शिवसेनेने साथ दिल्यानंतरही पदाधिकारी निवडीत डावलले गेल्याची शिवसेनेची भावना आहे. आ. विनय कोरे आणि माजी आ. सत्यजित पाटील यांच्यातील शाहूवाडी-पन्हाळ्यातील टशन कायम आहे. महापालिकेच्या राजकारणात दोन्ही काँग्रेसला शिवसेनेने मदत केली. तरीही विधानसभेत फासे उलटे पडले.

येत्या महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेस नुरा कुस्ती खेळून शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवतील, अशी अटकळ बांधली जात आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे 'मातोश्री'वर असलेल्या संबंधांचा वापर करत जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी आणलेले आदेश पुन्हा फिरवत असल्याची खदखद शिवसेना पदाधिकार्‍यांत आहे. या सर्वाचा परिपाक म्हणून शिवसेनेने स्वतंत्र पॅनेल करण्याचा निर्णय घेतला असावा.

अंदाज ठरला खोटा ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

गोकुळ दूध संघाप्रमाणेच जिल्हा बँकेत आजी-माजी आमदारांना संधी हवी होती. याआधारे तालुक्यातील राजकारणात वजन कायम राहील, अशी अटकळ सेना नेत्यांची होती. दोन्ही काँग्रेसने दोन जागा दिल्या आणि तिसरी स्वीकृत संचालकपदाची संगीतखुर्ची शिवसेनेपुढे ठेवली होती. जिल्ह्यातील सेनेचे नेते आपल्या शब्दापुढे जाणार नाहीत, अशी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची अटकळ सेनेच्या पॅनेलमुळे खोटी ठरली.

टायमिंग साधत शिवसेनेने घेतली रणांगणात उडी ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

विधानसभा निवडणुकीत भाजपसह दोन्ही काँग्रेसचा सामना शिवसेनेला करावा लागणार आहे. सर्वच निवडणुकांत दोन्ही काँग्रेससोबत समझोता केल्यास शिवसेनेच्या तालुक्यांतील नेत्यांची विधानसभा निवडणुकीत कोंडी होणार, हे स्पष्ट होते. त्यामुळेच जिल्हा बँकेची टायमिंग साधत शिवसेनेने रणांगणात उडी घेतली आहे. गटा-तटाच्या, सग्यासोयर्‍यांसह समझोत्याच्या राजकारणात शिवसेनेचे नेते अडकून पडले की, अस्तित्वासाठी ताकदीने निवडणूक लढवली, हे जिल्हा बँकेच्या निकालावरून स्पष्ट होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT