जर तुम्ही कधी विमानतळावर गेले असाल तर तुम्हाला लक्षात आले असेल की जवळजवळ सर्वच विमाने पांढऱ्या रंगाची असतात. लहान देशांतर्गत विमानांपासून ते मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानांपर्यंत, बहुतेक विमानांची बॉडी पांढरी असते आणि त्यावर फक्त एअरलाइनचा लोगो किंवा नाव असते. हा फक्त योगायोग नसून यामागे अनेक तांत्रिक आणि आर्थिक कारणे आहेत. पांढरा रंग फक्त सौंदर्यासाठी नाही तर सुरक्षितता, इंधन बचत आणि देखभाल खर्चाशी थेट संबंधित आहे. चला जाणून घेऊया विमानांना पांढरा रंग का दिला जातो.
विमान बराच वेळ सूर्यप्रकाशात उभे असते आणि उंच आकाशात उडताना तीव्र किरणांना सामोरे जाते. पांढरा रंग सूर्यप्रकाश परावर्तित करतो, ज्यामुळे विमानाचे बाह्य तापमान कमी राहते. जर विमान गडद रंगाचे असेल तर ते अधिक उष्णता शोषून घेईल, ज्यामुळे केबिन थंड ठेवण्यासाठी एअर कंडिशनरला जास्त ऊर्जा लागेल आणि त्याचा थेट परिणाम इंधन खर्चावर होतो. त्यामुळे विमान कंपन्या पांढऱ्या रंगाची निवड करून इंधन आणि ऊर्जा दोन्ही वाचवतात.
विमानवाहतुकीत सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. पांढऱ्या रंगावर भेगा, ओरखडे, गंज, तेल गळती यासारख्या समस्या लवकर दिसतात आणि दुरुस्ती वेळेत करता येते. गडद रंगात अशा समस्या ओळखायला वेळ लागतो, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो.
विमानांना सतत पाऊस, सूर्यप्रकाश, बर्फ, वारा यांना तोंड द्यावे लागते. गडद किंवा आकर्षक रंग पटकन फिकट होतात किंवा सोलायला लागतात. पांढरा रंग मात्र दीर्घकाळ टिकतो आणि विमान स्वच्छ व नवीनसारखे दिसते. पुन्हा रंगवण्यासाठी १ ते २ आठवडे लागतात आणि खर्च लाखो रुपयांमध्ये होतो. त्यामुळे एअरलाइनसाठी पांढरा रंग हा आर्थिक दृष्ट्या फायदेशीर पर्याय आहे.
विमान रंगवताना प्रत्येक थरामुळे वजन वाढते. पांढरा रंग हलका असल्याने तो इंधन कार्यक्षमतेत मदत करतो. विमानाचे वजन जितके कमी तितका इंधनाचा वापरही कमी होतो.
विमान ही मोठी गुंतवणूक असल्यामुळे विमान कंपन्या ती इतरांना विकतात किंवा भाड्याने देतात. पांढऱ्या रंगाची विमाने सहजपणे नव्या कंपनीच्या ब्रँडिंगसाठी वापरता येतात. फक्त लोगो किंवा डिझाइन बदलावे लागते, त्यामुळे पुन्हा पूर्ण पेंटिंगचा खर्च येत नाही.
पांढरा रंग दूरवरून स्पष्टपणे दिसतो. आकाशात किंवा जमिनीवर विमान पटकन ओळखता येते, जे आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरते.
अभ्यासानुसार पांढऱ्या रंगाची विमाने पक्षांना जास्त स्पष्ट दिसतात आणि त्यामुळे पक्षी त्यांना टाळतात. यामुळे पक्ष्यांच्या धडकांची संख्या कमी होते आणि विमानवाहतुकीची सुरक्षितता वाढते.
अपवादात्मक उदाहरण – एअर न्यूझीलंड
जरी बहुतेक विमाने पांढरी असली तरी एअर न्यूझीलंडने २००७ मध्ये त्यांच्या काही विमानांना काळा रंग देऊन एक वेगळा ट्रेंड सुरू केला. हा न्यूझीलंडच्या राष्ट्रीय रंगाचा सन्मान करण्याचा प्रयत्न होता. तरीही जगभरातील ९०% पेक्षा जास्त विमाने आजही पांढऱ्या रंगाचीच आहेत.